मविप्र करंडक अ.भा. वक्तृत्व स्पर्धेस प्रारंभ
By admin | Published: January 18, 2017 11:22 PM2017-01-18T23:22:32+5:302017-01-18T23:22:58+5:30
पवार : समाजप्रबोधनासाठी वक्तृत्व कला आवश्यक
नाशिक : शिक्षण, राजकारण, समाजकारण, कायदा आदि क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी चांगल्या वक्तृत्वाची आवश्यकता असते, असे प्रतिपादन मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार यांनी केले. त्या केटीएचएम महाविद्यालयाच्या वतीने आयोजित अखिल भारतीय मविप्र करंडक वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, व्यासमुनींनी आपल्या ओजस्वी वाणीने जे भाषण केले होते ते श्रीगणेशाने लिहून काढले. त्यामुळे ज्या जागेवरून प्रबोधन केले जाते त्याला व्यासपीठ असे म्हणतात. त्या व्यासपीठावरती अधिराज्य गाजविण्यासाठी व समाजप्रबोधन करण्यासाठी वक्तृत्व कला आवश्यक आहे. चांगले वक्ते होण्यासाठी आधी चांगले श्रोते झाले पाहिजे, असे विचार त्यांनी यावेळी मांडले. रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्या कार्यक्रमास प्रतापदादा सोनवणे, अॅड. नितीन ठाकरे, नाना महाले, प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर, शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. काजळे , प्रा. एस. के. शिंदे, डॉ. एन. एस. पाटील, प्रा. रामनाथ चौधरी, सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते.यावेळी उपस्थित स्पर्धकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. आर. डी. दरेकर यांनी केले. या स्पर्धेसाठी आग्रा (उत्तर प्रदेश), भोपाळ, मध्य प्रदेश, सिल्वासा, नाशिक येथील ७५ स्पर्धकांची नोंदणी झाली आहे. परीक्षक म्हणून डॉ. केशव देशमुख, डॉ प्रदीप देशपांडे, डॉ. सत्यवान घाणेगावे यांनी काम पाहिले. याप्रसंगी डॉ डी. पी. पवार, प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)