ऑक्सिजनअभावी माझे पती गेले, हेही खोटे समजायचे का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:14 AM2021-07-29T04:14:21+5:302021-07-29T04:14:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : शहरात ज्या वेळी ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवत होता, त्या काळात अनेक नागरिकांना ऑक्सिजन बेडच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरात ज्या वेळी ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवत होता, त्या काळात अनेक नागरिकांना ऑक्सिजन बेडच मिळत नसल्याने घरीच जीव गमवावा लागला. तर काही जण रुग्णालयात पोहोचूनही केवळ साधा बेड मिळाला, पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होऊ न शकल्याने जीव गमवावा लागला. आमचे वडील बाबासाहेब कोळे यांनादेखील ऑक्सिजनअभावी जीव गमवावा लागला होता, हे खोटे समजायचे का, असा सवाल कोळे यांच्या पत्नीने केला आहे.
‘त्या’ दिवशी काय घडले?
कामटवाडे येथे राहणारे बाबासाहेब कोळे हे कोरोनाबाधित झाले. उपचार सुरू केल्यानंतरही त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता होती. मात्र, शासकीय, मनपा किंवा खासगीतही कुठेच ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नव्हता.
अखेरीस कोळे कुटुंबीय बाबासाहेब यांना घेऊन सिव्हिलला आले. मात्र, तिथेही बेड मिळत नसल्याने त्यांनी मनपा मुख्यालयात जाऊन विचारणा करण्याचा निर्णय घेतला. कोळे यांना ॲम्ब्युलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडर लावून नाशिक मनपाच्या मुख्यालयात आणले. मनपाकडून थातूरमातूर उत्तरे देण्यात आल्याने त्यांनी मनपात आलेल्या दीपक डोके यांच्याशी संपर्क साधून ऑक्सिजन बेड मिळवून देण्याची विनंती केली.
अखेर माध्यमांसमोर गाऱ्हाणे मांडल्यानंतर यंत्रणा थोडीशी हलली. त्यानंतर त्यांना बिटको रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथेदेखील कागदपत्रे नोंदणीत खूप वेळ वाया गेला. सर्व प्रक्रियेत प्रदीर्घ काळ गेल्याने कोळे यांना जीव गमवावा लागला. इतकी मोठी घटना सर्वांसमोर होऊनही ऑक्सिजनअभावी जीव गेला नाही, असे कोणीही कसे म्हणू शकते, असा सवाल कोळे यांच्या पत्नीने उपस्थित केला आहे.
-------------------------
कोट
कोरोनाने कुटुंबावर खूप वाईट वेळ आणली. मुले अजूून लहान असून कामटवाडेतील शाळेमध्ये शिकतात. अशा परिस्थितीत इतरांच्या घरी धुणीभांडीची कामे करून जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. शासनाकडून अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही.
सुरेखा कोळे, कोरोनाबाधित व्यक्तीची पत्नी
-----------------
फोटो
२८कोळे