पंढरीसी जावे ऐसे माझे मनी! विठाई जननी भेटे केव्हा !!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:11 AM2021-05-28T04:11:32+5:302021-05-28T04:11:32+5:30
सायखेडा (बाजीराव कमानकर) : पंढरीसी जावे ऐसे माझे मनी ! विठाई जननी भेटे केव्हा !! न लगे त्या ...
सायखेडा (बाजीराव कमानकर) : पंढरीसी जावे ऐसे माझे मनी ! विठाई जननी भेटे केव्हा !! न लगे त्या विना सुखाचा सोहळा ! लागे मज ज्वाळा अग्निचिया ! तुका म्हणे त्याचे पाहिलीया पाया ! मग दुःख जाय सर्व माझे !!
वारकरी सांप्रदाय आणि तमाम भाविक भक्तांना आषाढी एकादशी निमित्ताने शेकडो वर्ष सुरु असलेली वारीची ओढ लागली आहे. आषाढी एकादशी एक महिन्यावर येऊन ठेपली की नाशिक जिल्ह्यातील हजारो वारकऱ्यांचे पाय पंढरपूरच्या दिशेने निघतात. जवळपास एक महिना मजल दर मजल करत हा वारकरी भक्तिरसात तल्लीन होऊन विठूरायाला भेटायला जातात.
मागील वर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने वारी बंद करून प्रातिनिधिक स्वरूपात वारी काढून आषाढी साजरी केली होती. यंदा देखील कोरोनाचे संकट अजूनही गडद आहे, रुग्ण संख्या मंदावली असली तरी कोरोना आजार गेला असं म्हणता येणार नाही त्यामुळे शासन स्तरावर वारी संदर्भात कोणता निर्णय घेतला जातो याकडे राज्यातील वारकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
शेकडो वर्षांची परंपरा खंडित करून भाविकांचा अंत न पाहता वारीत जाणाऱ्या प्रत्येक भाविकांची कोरोना चाचणी करुन त्यांना लस देऊन यंदा वारीचा सोहळा व्हावा अशी मागणी वारकरी संप्रदायाचे प्रदेश अध्यक्ष नितीन सातपुते यांनी केली आहे. वारकऱ्यांची संख्या आणि ज्या गावातून हा सोहळा जाणार आहे, त्या गावच्या दोन किलोमीटर अंतरावर मुक्काम ठेऊन इतर गावांना त्रास होणार नाही याची काळजी घेत मर्यादित स्वरूपात का होईना पण हा सोहळा झाला पाहिजे असे मत ह. भ. प. कृष्णा महाराज कमानकर यांनी व्यक्त केले.
वारीची तयारी करण्यासाठी भाविकांना काही दिवस वेळ हवा असतो. त्यामुळे शासन काय निर्णय घेते, मागील वर्षीप्रमाणे यंदा सोहळा रद्द होणार की निवडक वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणार याकडे वारकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
------------------------
सुरक्षा वारी असावी, भाविकांची अपेक्षा
१)कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीत खंड पडू नये म्हणून वारी व्हावी मात्र, ही वारी मात्र सुरक्षा वारी असावी असे मत भाविकांकडून व्यक्त होत आहे.
२)संत निवृत्ती महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान त्र्यंबकेश्वर येथून सत्तावीस दिवस अगोदर होत असते, मात्र सद्य परिस्थितीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून राज्यात लॉकडाऊन सुरु असून संचारबंदी कायम आहे तर सर्व धार्मिक स्थळ भाविकांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत.
३) गतवर्षी शासनाने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच संतांच्या पालखीचा सोहळा रद्द केला होता. वारीची परंपरा खंडित होऊ नये म्हणून शासनाच्या जबाबदारीवर प्रमुख निवडक संतांच्या पादुका वीस वारकऱ्यांसमवेत बसने पंढरीला विठूरायाच्या चरणी नेण्यात आल्या होत्या. वास्तविक शासनाने दिलेल्या नियमानुसार लाखो भाविकांनी आषाढी घरीच साजरी केली होती.