लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:12 AM2021-05-17T04:12:10+5:302021-05-17T04:12:10+5:30

गेल्या वर्षी कोरोना संसर्गाच्या साथीने सर्वत्र कहर केला. संसर्गातून होणाऱ्या या आजारामुळे नागरिकांमधील संपर्क कमी व्हावा यासाठी शासनाने लॉकडाऊन ...

My mother-in-law is happy for Leki's Mahera ... | लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते...

लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते...

Next

गेल्या वर्षी कोरोना संसर्गाच्या साथीने सर्वत्र कहर केला. संसर्गातून होणाऱ्या या आजारामुळे नागरिकांमधील संपर्क कमी व्हावा यासाठी शासनाने लॉकडाऊन केले. त्यामुळे अनेकांचे रोजगार, नोकऱ्या हिरावल्या गेल्या. उद्योग, व्यवसाय ठप्प झाले; परंतु सर्वांत मोठा फटका कुटुंबियांना बसला. सासरी असलेल्या माय-लेकी परस्परांच्या भेटीपासून वंचित राहिल्या, सणासुदीला आणि शुभकार्यातील भेटीही दुरापास्त झाल्या. अक्षय तृतीयेसारख्या सणाला माहेराची ओढ असलेल्या सासुरवाशिणी महिला भेटीवाचून मनातल्या मनातच हुरहुरत राहिल्या. बालगोपाळांसाठी हक्काचे असलेले मामाचे गाव या कोरोनाच्या महामारीत हरवून गेले. आजी-आजोबा आणि मामा-मामीची भेट घडली नाही म्हणून बालमने आठवणीतच करपून गेल्याचे चित्र दिसून आले.

गेल्या वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन, जिल्हाबंदी, गावबंदी लागू झाली. परिणामी कोणत्याही सणाच्या किंवा कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने माहेरी जाता आले नाही. आता, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. हे वर्षही माहेरपणाला पारखे झाले आहे. फोनवरून संपर्क, बोलणे होत असले तरी प्रत्यक्ष भेटीची ओढ आहेच.

- सौ. सुरेखा जाधव, येवला

आनंदाच्या क्षणी माहेरी जाता आले नाही. दुःखाच्याही काही घटना माहेरी घडल्या, त्यालासुद्धा माहेरी जाता आले नाही. एवढी मोठी महामारी आहे, त्यामुळे परिवाराव्यतिरिक्त सामाजिक कार्यातसुद्धा महिलांना वेळ देता येत नाही, एवढी आपत्ती कोरोनाने निर्माण केली आहे. घरीच राहणे, सुरक्षित राहणे एवढाच उपाय उरलेला आहे.

- सौ. रेवती पाटील, पाळे खुर्द, ता. कळवण

सर्वत्र कोरोनाची भीती आहे. इच्छा असूनही आई-वडिलांची भेट घेता येत नाही. माहेर अहमदनगर जिल्ह्यात आहे. त्यात जिल्हाबंदी आहे. माहेरी जवळचे नातेवाईक वारले, मात्र कोरोनाचे सावट असल्याने जाता येत नाही. बस बंद आहे, अनेक अडचणी आहेत. माहेरी फोनवर रोज बोलणे होते, पण प्रत्यक्ष भेट घेता येत नाही. त्यामुळे दुःख वाटत असले तरी सर्वजण सुखात राहावेत असे वाटते.

- प्रियंका भोसले, वावी, ता. सिन्नर

लागली लेकीची ओढ...

कोरोनामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. आप्तस्वकीयांची भेट दुर्मीळ झाली आहे. अक्षय तृतीया व उन्हाळ्याच्या सुटीमध्ये लेकीची होणारी भेट गेल्या दोन वर्षांपासून होत नाही. लहान मुलांचे भावविश्व या कोरोनाने हिसकावून घेतले आहे. माय-लेकीची ताटातूट होत आहे. कोरोनाचे संकट लवकर दूर होऊन माय-लेकीची, नातेवाइकांची भेट घडो.

- अलका शेवाळे, टेहरे, ता. मालेगाव

कोरोना आजाराने थैमान घातले, तेव्हापासून जवळपास एक वर्ष झाले. सासुरवाशीण मुली असूनही माहेरी आल्या नाहीत. कोरोनाची भीती, लहान मुले, एकत्र कुटुंब यामुळे घरचे भेटायलासुद्धा पाठवायला तयार नाहीत. दोन महिन्यांतून भेटायला येणाऱ्या मुली भेटत नसल्याने ओढ लागली आहे. नातवंडेदेखील भेटत नाहीत. केवळ फोनवरून दोन शब्द बोलले जातात, प्रत्यक्ष मात्र भेटीगाठी नसल्याने ओढ लागली आहे.

- मंगला खालकर, भेंडाळी, ता. निफाड

मामाच्या गावाला जायला केव्हा मिळणार?

देवळा हे माझ्या मामाचं गाव. मामाच्या गावाला जायचं आहे; परंतु मम्मी-पप्पा घराबाहेर निघू देत नाहीत. वर्षभरापासून मामाच्या गावाला गेले नाही. आधी शाळा सुरू असायची म्हणून वेळ मिळत नव्हता. आता वेळ असूनही लॉकडाऊनमुळे मामाच्या गावाला जाता येत नाही.

-शिर्षा शिंदे, कळवण

सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने इंदूर येथे मामाच्या गावाला जाता आले नाही. दरवर्षी शाळेला सुटी लागली की लगेच गावाला जात होतो. आता सुटी भरपूर मिळत असली तरी तिचा उपभोग घेता येत नाही. मामा-मामी व आजी-आजोबा यांच्याबरोबर सुटीत विविध खेळ खेळण्याची मजा कोरोनाने हिरावून नेली आहे. घरातून बाहेर जाता येत नसल्याने घरातच मोबाइलवरील गेम खेळावे लागतात.

- बाबू गोपाल नागरे, मनमाड

मी दरवर्षी मामाच्या गावाला महिनाभरासाठी जात असे, परंतु गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे आम्ही कुठेच गेलो नाही. माझे सर्वांत आवडीचे ठिकाण म्हणजे माझ्या चांदवडच्या मामाचे घर. तिथे गेले की दिवसभर वेगवेगळे खेळ, तिथल्या मित्र-मैत्रिणींबरोबर खेळत असायचो. वेगवेगळा खाऊ खायला मिळायचा. मामाच्या शेतात दिवसभर फिरायचो. आता मला घरात कंटाळा आला आहे. कोरोना संपला की मी आधी मामाच्या गावाला जाईल आणि खूप मज्जा करणार आहे.

- अनन्या काळे, घोटी

===Photopath===

160521\16nsk_3_16052021_13.jpg

===Caption===

माहेरवाशिण

Web Title: My mother-in-law is happy for Leki's Mahera ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.