‘मेरा रंग दे बसंती चोला’ने रंगली संगीत संध्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 01:26 AM2018-08-12T01:26:53+5:302018-08-12T01:27:27+5:30
‘ऐ मेरे वतन के लोगो...’, ‘ये देश हैं वीर जवानों का...’, ‘जिंदगी मौत ना बन जायें संभालो यारो... अशा एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर हिंदी गीतांची धून भारतीय वायुसेनेच्या बॅन्ड पथकाने सादर करून नाशिककरांमधील देशक्तीचे स्फु लिंग जागविले.
नाशिक : ‘ऐ मेरे वतन के लोगो...’, ‘ये देश हैं वीर जवानों का...’, ‘जिंदगी मौत ना बन जायें संभालो यारो... अशा एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर हिंदी गीतांची धून भारतीय वायुसेनेच्या बॅन्ड पथकाने सादर करून नाशिककरांमधील देशक्तीचे स्फु लिंग जागविले.
निमित्त होते, भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देवळाली येथील वायुसेना केंद्राच्या वतीने आयोजित भारतीय संरक्षण व स्वातंत्र्यावर आधारित प्रश्नमंजूषा आणि संगीत संध्या मैफलीचे. उंटवाडी येथील सिटी सेंटर मॉलमध्ये शनिवारी (दि.११) झालेल्या या देशभक्तीपर कार्यक्रमाला नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून देवळाली केंद्राचे एअर कमांडर विशिष्ट सेवा मेडल रवि शर्मा यांच्यासह वायुदलाचे विविध लष्करी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पथकाच्या सुमारे २४ वादकांनी एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर गीतांसह काही पश्चिमात्य गीतांच्या धूनही वाजविल्या. प्रारंभी वायुदलाची मार्शल धून ‘एअर बॅटल’ने मैफलीला सुरुवात करण्यात आली. यानंतर सिम्फोनी-४०, कॉर्नफ्लिड रॉक, भारतीय क्लासीकल राग बहार, जुबी डुबी, ये मेरा दिल (हिंदी मेलडी), सुनो गौर से दुनियावालों... अशा विविध गीतांची धून बॅन्ड पथकाच्या वादकांनी आपल्या कौशल्यपूर्ण शैलीत सादर करत उपस्थितांची मने जिंकली. मैफलीचा समारोप ‘वंदे मातरम्...’ च्या धूनने करण्यात आला. यावेळी ये देश हैं वीर जवानों का..., ऐ मेरे वतन के लोगो... या गीतांच्या धूनला ‘वन्समोअर’ही मिळाला. उपस्थित श्रोत्यांनी मैफलीच्या समारोपप्रसंगी ‘भारत माता की जय...’ अशी घोषणा देत देशभक्तीचा जागर केला.
भारतीय वायुसेनेचा जगात चौथा क्रमांक लागतो. युद्धामध्ये निर्णायक भूमिका बजावणाऱ्या वायुदलाच्या वतीने प्रथमच सर्वसामान्य नागरिकांमध्ये जाऊन अशा पद्धतीने देशक्तीपर गीतांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम शहरात सादर करण्यात आला. सूत्रसंचालन सुजीतकुमार झा यांनी केले.
प्रश्नमंजूषेचा उत्साह
संगीत मैफलीच्या प्रारंभी वायुदलाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास व सैन्यदलाशी संबंधित दहा ते पंधरा विविध सामान्यज्ञानावर आधारित वैकल्पिक प्रश्न उपस्थित प्रेक्षकांना विचारण्यात आले. यावेळी बहुतांश नाशिककरांनी या स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला. यावेळी अचूक उत्तरे देणाºया प्रेक्षकांना वायुदलाच्या वतीने ‘कॅप’, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.