माझी स्क्रिप्ट पवार, फडणवीस यांनी लिहिली नाही : भुजबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 06:27 AM2023-11-22T06:27:45+5:302023-11-22T06:28:18+5:30
भुजबळ यांनी त्यांच्याकडे एवढी संपत्ती आहे, याबद्दल मी दमानिया यांचे अभिनंदन करतो, अशी टिप्पणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : माझी स्क्रिप्ट शरद पवार लिहून देत नव्हते आणि आताही अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेली नाही. भुजबळ कोणाची स्क्रिप्ट वाचत नाही, असा टोला ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी विरोधकांना लगावला.
जरांगे पाटील, दमानिया यांना शुभेच्छा
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे - पाटील यांची नाशिक जिल्ह्यात सभा होणार आहे. त्याबद्दल विचारल्यानंतर भुजबळ यांनी जरांगे यांना शुभेच्छा दिल्या, तर अंजली दमानिया यांनी अलीकडेच केलेल्या आरोपावर ते म्हणाले की, यापूर्वी माजी खासदार समीर भुजबळ यांनी ब्लॅकमेलरबद्दल भूमिका मांडली आहे. छगन भुजबळांसारखे पाच जण जेवढे कर भरत नाहीत एवढा कर माझे पती भरतात, असे अंजली दमानिया म्हटल्याचे विचारल्यावर भुजबळ यांनी त्यांच्याकडे एवढी संपत्ती आहे, याबद्दल मी दमानिया यांचे अभिनंदन करतो, अशी टिप्पणी केली.
जालना येथील ओबीसी एल्गार सभेत आक्रमक भाषण केल्यानंतर स्क्रिप्ट कोणी लिहिली, असा सवाल भुजबळ यांच्या विरोधकांनी केला होता. त्यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना भुजबळ म्हणाले की, ओबीसींच्या हक्काची स्क्रिप्ट मी ३५ वर्षांपासून सादर करीत आहे. माझी ही स्क्रिप्ट फुले - शाहू - आंबेडकर यांनी लिहिलेली आहे.
‘मी एकटा पडलेलो नाही’
nओबीसी आरक्षणासाठी मी एकटा पडलेलो नाही. मात्र, काहींना व्यासपीठावर येण्यात अडचण येते.
nतर काहीजण व्यासपीठावर आल्यानंतर पुन्हा वेगळी भूमिका घेत आहेत, असे करण्यामागे ज्याचा त्याचा प्रश्न आहे, ज्याने त्याने आपापल्या पक्षात
राहून का होईना; परंतु, ओबीसींच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन भुजबळ यांनी केले.