नाशिकमध्ये येण्यामागे माझा स्वार्थ - राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 05:08 AM2017-12-27T05:08:06+5:302017-12-27T05:08:08+5:30
नाशिक : नाशिकमध्ये येण्यामागे येथील कोकणी माणसांना भेटण्यासोबतच आपला वैयक्तिक स्वार्थही असल्याचे सांगत नारायण राणे यांनी नाशिकमधून विधान परिषद निवडणूक लढविण्यासंदर्भात अप्रत्यक्षपणे सूतोवाच केले.
नाशिक : नाशिकमध्ये येण्यामागे येथील कोकणी माणसांना भेटण्यासोबतच आपला वैयक्तिक स्वार्थही असल्याचे सांगत नारायण राणे यांनी नाशिकमधून विधान परिषद निवडणूक लढविण्यासंदर्भात अप्रत्यक्षपणे सूतोवाच केले.
भाजपाने आपल्याला विचारणा केल्यास त्यावर विचार करू, असे सांगत विधान परिषदेची उमेदवारी करणार की नाही हे गुपित त्यांनी उघड केले नाही. विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राणे निवडणूक लढविण्यासाठी व्यूहरचना करीत असून, भाजपाही त्याला अनुकूल असल्याची चर्चा आहे. मंगळवारी कोकणी बांधवांच्या कार्यक्रमास राणे यांची उपस्थिती राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढविणारी ठरली.
कोणापुढेही झुकणे मान्य नसल्याने आपण महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. सत्तेत असताना विकास करणे शक्य असल्यानेच एनडीएमध्ये समाविष्ट झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणासाठी सरकार अनुकूल असून, मुख्यमंत्र्यांनी निवडणुकांपूर्वी मराठा आरक्षण देण्याचे आश्वासनही दिले असल्याचे त्यांनी सांगितले. माजी आमदार माणिकराव कोकाटे व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल यांनी राणे यांची भेट घेतली.