माझा धागा पक्का, विरोधकांचा पतंग कापू : छगन भुजबळ
By धनंजय वाखारे | Published: January 15, 2024 05:42 PM2024-01-15T17:42:50+5:302024-01-15T17:44:12+5:30
येवल्यात रंगला पतंगोत्सव
सुनील गायकवाड, येवला (नाशिक) : आकाशात झेपावणारे पतंग हे अधिक उंचावर गेले पाहिजे. हे सर्व आपल्यालाच लोकांचे पतंग आहेत. ते कापण्याचा प्रश्नच येत नाही.माझा धागा पक्का आहे. मात्र येणाऱ्या निवडणुकीत जे आपल्या समोर विरोधक असतील त्यांचा पतंग या मतदारसंघातील जनतेच्या बळावर नक्कीच कापू, अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने येवला येथे सोमवारी (दि.१५) पतंग उत्सवास भुजबळ यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी पतंग उडविण्याचा मनमुराद आनंद लुटला.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, गेल्या निवडणुकांमध्ये अनेक लोक आपल्या विरोधात उभे ठाकले होते. येवल्याच्या जनतेने मात्र त्यांचा धागा कापला आहे. येणाऱ्या निवडणुकीत ज्यांची इच्छा आहे. त्यांनी विरोधात लढावं. मतदारसंघातील जनता त्यांना घरचा रस्ता दाखवतील असा खोचक टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. जनतेच्या विश्वासाचा धागा पक्का असल्याने माझा धागा कायम राहणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, भुजबळ यांच्याकडून तिळगुळ वाटप करण्यात आले. चित्रकार संतोष राऊळ यांनी मंत्री छगन भुजबळ यांना त्यांचे चित्र रेखाटलेला पतंग भेट दिला. येवल्यात पतंगोत्सवाची धूम सुरू असून काही दिवस हा उत्सव रंगणार आहे.