नागपंचमीची परंपरा पावतेय लोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 12:58 AM2017-07-27T00:58:18+5:302017-07-27T00:58:37+5:30
नाशिक : ‘चल गं सखे वारूळाला, नागोबा पूजायला’ अशी गाणी म्हणत, फुगड्या, झिम्मा खेळत झाडाला झोके बांधून नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्याची प्रथा भारतीय संस्कृतीत हजारो वर्षांपासून सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : ‘चल गं सखे वारूळाला, नागोबा पूजायला’ अशी गाणी म्हणत, फुगड्या, झिम्मा खेळत झाडाला झोके बांधून नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्याची प्रथा भारतीय संस्कृतीत हजारो वर्षांपासून सुरू आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून ही परंपरा लोप पावत असल्याचे दिसते. श्रावण शुद्ध पंचमीला हा सण साजरा करण्यात येतो. वाढत्या शहरीकरणामुळे वारूळे नष्ट झाल्याने शहरी भागात काही ठिकाणी केवळ घरच्या घरी नागनरसोबाच्या चित्राची पूजा करण्यात येते. ग्रामीण भागात काही प्रमाणात आता केवळ जुन्या पिढीकडूनच हा सण साजरा करण्यात येतो. नव्या पिढीमध्ये या सणाबद्दल फारशी जागृती दिसत नाही.भारतीय संस्कृतीत पशुपक्ष्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांची पूजा करण्याची प्रथा आहे. शेतीचे उंदरांपासून रक्षण करणाऱ्या नागासाठी नागपंचमी हा सण साजरा करण्यात येतो. या सणाबद्दल पुराणकाळापासून अनेक कथा आहेत. आपला देश कृषिप्रधान असल्याने शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागाचे नागपंचमीला पूजन करण्याची प्रथा आहेत. परंतु कालौघात सापांबद्दल अनेक गैरसमज निर्माण झाल्याने नागासह सापांच्या अनेक जाती नष्ट झाल्या. ग्रामीण भागात सापांबद्दल अनेक गैरसमज असल्याने सर्पमित्रांकडून प्रबोधन करण्यात यावे, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. कारण साप चावण्याच्या घटना पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर घडतात. वेळीच वैद्यकीय उपचार करण्याऐवजी लोक बुवा बाबा व मांत्रिकाकडे जातात. त्यामुळे साप चावलेल्या व्यक्तींचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे साहजिकच कोणताही साप दिसल्यावर तो विषारी साप समजून त्याला ठार मारले जाते. वास्तविक सर्पमित्रमांकडून कोणता साप विषारी आणि कोणता बिनविषारी यासंबंधी नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर प्रबोधन झाल्यास सापांचा जीव वाचून पर्यावरणाचे रक्षण होईल, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त करण्यात आली आहे.