‘नाम फाउण्डेशन’ ही माणुसकीसाठीची चळवळ
By admin | Published: May 11, 2017 02:23 AM2017-05-11T02:23:21+5:302017-05-11T02:23:31+5:30
नाशिक : नाम फाउण्डेशन माणसाने माणुसकीसाठी उभी केलेली चळवळ आहे, या उपक्रमाला पाटेकरांमुळे लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले असे प्रतिपादन अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नाम फाउण्डेशन ही माणसाने माणुसकीसाठी उभी केलेली चळवळ आहे आणि या उपक्रमाला नाना पाटेकरांमुळे लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले असे प्रतिपादन अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी बुधवारी (दि. १०) ‘नाम फाउण्डेशन आणि सामाजिक भान’ या विषयावर बोलताना व्यक्त केले.
देवमामलेदार यशवंतराव महाराज पटांगण येथे वसंत व्याख्यानमाला अंतर्गत दहावे पुष्प गुंफताना मकरंद अनासपुरे यांनी नाम फाउण्डेशन या लोकचळवळीचे विविध पैलू उलगडून सांगितले. यावेळी अनासपुरे यांनी विचार माणसाला बदलत असल्याने विचारांचा प्रवास सगळ्यांपर्यंत पोहोचवायला हवा असे आवाहन केले.
जीवनात एकमेकांशी सुसंवाद राखणे महत्त्वाचे आहे हे सांगताना अनासपुरे यांनी मालक म्हणून जीवनात वावरणे चुक ीचे ठरेल आणि अशा वागण्यामुळे लोभ वाढत जातो आणि जीवनात आपण काहीतरी करायला आलोय ही भावना मनात ठेवून आपण जीवनात आलो हा हेलपाटा होता कामा नये, असेही अनासपुरे यांनी यावेळी सांगितले.
लोकचळवळ किंवा समाजोपयोगी काम कुणीही केले असले तरी त्याची फलश्रुती महत्त्वाची आहे तसेच पाणीबचत आणि अधिकाधिक झाडे लावण्यासंबंधी नागरिकांनी गंभीर होणे आवश्यक आहे याकडेहीअनासपुरे यांनी लक्ष वेधले. यावेळी शेतकऱ्यांना आपण ‘बिझिनेस मन’चा दर्जा केव्हा देणार असा सवाल उपस्थित करताना हुंडा घेणे हे नामर्दपणाचे लक्षण आहे तसेच प्रत्येकाने आपल्यातला रिअल हिरो शोधायला हवा आणि खरे वागण्याचा प्रयत्न करायला हवा, असे आवाहन अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले.
गोदाघाटावर आयोजित या व्याख्यानास प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी अनासपुरे यांनी गोदावरी नदी प्लॅस्टिक मुक्त करण्याचे आणि दर रविवारी गोदा परिसर स्वच्छ राखण्यासाठी युवकांनी पुढे यायला हवे, असे आवाहन केले.
यावेळी व्यासपीठावर सत्यजित मेणे, मनाली मेणे, शोभना मेणे, संगीता बाफणा, अरुण शेंदुर्णीकर, सावळीराम तिदमे, सचिन शिंदे, श्रीकांत बेणी तसेच चंद्रशेखर शहा, धर्माजी बोडके, सचिन शिंदे आदी उपस्थित होते.