'नॅब'चा महत्त्वाकांक्षी प्रकल्प : दृष्टिबाधितांना मिळणार हक्काचा ‘निवारा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 05:43 PM2019-02-19T17:43:11+5:302019-02-19T17:50:31+5:30
समाजातील दृष्टीबाधित ज्येष्ठांसह डोळस ज्येष्ठांकरिता वृध्दाश्रम उभारले जात आहे. या वृध्दाश्रमाच्या आणि वसतीगृहाच्या मिळून सुमारे ४० खोल्यांची अदयावत इमारत साकारली जात आहे.
नाशिक : दृष्टिबाधितांना हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्यासाठी दि नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाडच्या वतीने शहराजवळील बेळगाव ढगा शिवारात हक्काचे वसतीगृह उभारणीच्या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. याबरोबरच दृष्टिबाधित ज्येष्ठ व डोळस ज्येष्ठ नागरिकांनाही संस्थेकडून निवासाची व्यवस्था वृध्दाश्रमाद्वारे करून दिली जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष निर्मला शाह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गंगापूररोडवरील राका कॉलनीमध्ये असलेल्या ‘नॅब’ कार्यालयात पत्रकारांशी पदाधिकाऱ्यांनी संवाद साधला. यावेळी माजी अध्यक्ष अॅड.प्रकाशचंद सुराणा यांनी नॅबच्या कार्याचा आढाव घेताना सांगितले. तत्कालीन अध्यक्षपदी असताना समाजाकडून आलेल्या मदतीच्या हातातून मिळालेल्या निधीची बचत दुरदृष्टी ठेवून केली. या निधीमधूनच ५४ गुंठे जागा संस्थेला खरेदी करता आली. या जागेवर दृष्टीबाधितांकरिता वसतीगृह व वृध्दाश्रम उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला गेला आहे. या प्रकल्पामध्ये केवळ वास्तू नसून सर्वच भौतिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न राहणार आहे.
समाजातील दृष्टीबाधित ज्येष्ठांसह डोळस ज्येष्ठांकरिता वृध्दाश्रम उभारले जात आहे. या वृध्दाश्रमाच्या आणि वसतीगृहाच्या मिळून सुमारे ४० खोल्यांची अदयावत इमारत साकारली जात आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी सामाजिक बांधिलकीतून संस्थेला या प्रकल्पासाठी मदत करावी, असे आवाहन यावेळी सचिव शितल सुराणा यांनी केले. संस्थेने स्वखर्चाने सुमारे पावणेदोन कोटी रूपये खर्च करून जमिनीची खरेदी केली असून बांधकामासाठी लागणारा निधी कमी पडत असल्याचे ते म्हणाले. यावेळी संगिता शहा, अनिल चव्हाण, अॅड. विद्युलता तातेड आदि उपस्थित होते.
--इन्फो--
अद्ययावत सोयीसुविधा
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत केवळ इमारत नसून तेथे अद्ययावत अशा सोयीसुविधाही पुरविल्या जाणार आहे. ग्रंथालय, ध्यानधारणा कक्ष, भोजनालय, प्रार्थनागृह, वैद्यकिय उपचार-देखभाल कक्ष, जॉगिंग ट्रॅक, इनडोअर क्रिडांगण, लिफ्ट अशा सर्वच अत्यावश्यक सोयीसुविधा पुरविण्याचा मानस असल्याचे सुराणा यांनी सांगितले.