पंचवटी एक्स्प्रेसचे इंजिन नादुरुस्त्र
By admin | Published: July 21, 2016 01:37 AM2016-07-21T01:37:21+5:302016-07-21T01:43:39+5:30
ओढा स्थानक : गाड्यांना झाला विलंब
नाशिकरोड : नाशिकरोड जवळील खेरवाडी-ओढा दरम्यान पंचवटी एक्स्प्रेसचे बुधवारी सकाळी इंजिन नादुरुस्त झाल्याने तब्बल पावणेदोन तास उशिराने पंचवटी मुंबईला रवाना झाली. यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी नाशिकरोड रेल्वेस्थानकावर घोषणा देत रेल्वेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
मनमाडहून मुंबईला जाणारी नाशिककरांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली पंचवटी एक्स्प्रेस बुधवारी सकाळी आपल्या निर्धारित वेळेला मनमाडवरून निघाली. पंचवटीच्या इंजिनमध्ये प्रारंभी बिघाड झाल्याने थांबा नसलेल्या खेरवाडी रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आली. तेथून रेल्वे इंजिन सुरू झाल्याने पंचवटी नाशिकरोडच्या दिशेने निघाली असता ओढाच्या अगोदर काही अंतरावर पुन्हा इंजिनमध्ये बिघाड होऊन ७.२५ वाजता पंचवटी एक्स्प्रेस थांबविण्यात आली
.तीन रेल्वे गाड्यांना खोळंबा; प्रवाशांची गैरसोय
खेरवाडी-ओढा दरम्यान इंजिन नादुरूस्त झाल्याने मुंबईला जाणाऱ्या तीन रेल्वेना खोळंबा झाला होता. यामुळे सेवाग्राम- दीड तास, कलकत्ता-हावडा मेल- दोन तास व जनशताब्दी एक्स्प्रेस- अर्धा तास उशिराने धावल्या. यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले होते.