नाफेडचे राज्यात १ लाख ५० हजार मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:11 AM2021-06-24T04:11:23+5:302021-06-24T04:11:23+5:30
वणी (प्रवीण दोशी) : कांदा खरेदी-विक्री व्यवहार गतिमान करण्यासाठी महाराष्ट्रात नाफेडने १ लाख ५० हजार मेट्रिक टन कांदा खरेदी ...
वणी (प्रवीण दोशी) : कांदा खरेदी-विक्री व्यवहार गतिमान करण्यासाठी महाराष्ट्रात नाफेडने १ लाख ५० हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचे नियोजन आखले आहे. लासलगाव, पिंपळगाव पाठोपाठ वणी उपबाजारात नाफेडने एजन्सीमार्फत कांदा खरेदी सुरु केली असून कांद्याच्या दरात असमान स्थिती होऊ नये व कांदा सर्वसामान्यांच्या आवाक्यात असावा व दराबाबत स्थैर्याचे वातावरण असावे असा उद्देश यामागे असल्याची माहिती निर्यातदार व एजन्सीधारक मनीष बोरा यांनी दिली.वणी उपबाजारात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर होते. आर्थिक उलाढाल ही मोठी आहे. कांदा उत्पादकांना दराबाबत अस्थिरता होऊ नये यासाठी व्यापारी व निर्यातदार यांनी सकारात्मक भूमिका घेत नाफेडमार्फत कांदा खरेदीसाठी तयारी दाखविली आहे. सद्यस्थितीत उत्तरप्रदेश,बिहार, कोलकाता व इतर राज्यात महाराष्ट्रातील कांदा विक्रीसाठी जात आहे. काही ठिकाणी कोरोनाच्या नियमावलीनुसार कांदा पाठवावा लागतो. त्यात निर्यातदार हे मलेशिया,कोलंबो,दुबई व आखाती देशात कांदा निर्यात करतात; मात्र सध्या पाकिस्तानचा कांदा हा भारतीय कांद्याच्या तुलनेत १०० डॉलर मेट्रिक टनाने स्वस्त पडतो. त्यामुळे हा कांदा आखाती देशातील ग्राहकांना तुलनात्मक स्वस्त पडतो. त्यामुळे पाकिस्तानच्या कांद्याला मागणी वाढलेली आहे. यामुळे या आव्हानाचा सामना कसा करावा याबाबत महाराष्ट्रातील निर्यातदार विचारमंथन करण्याच्या अवस्थेत आहेत. त्याबरोबर दक्षिणचा कांदा जुलै महिन्याच्या अंतिम टप्यात बाजारात येईल व हा कांदा प्रतिस्पर्धेच्या रुपात पुढे येईल. त्यावेळी भावाबाबतच्या स्थितीचा अंदाज बांधणे कठीण असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
-----------------------
कांदा दराबाबत स्थिरतेचे वातावरण
कांदा हा जीवनातला अविभाज्य घटक असून नित्यनेमाने त्याची आवश्यकता भासतेच. ती गरज पूर्ण होण्यासाठी व कांदा उत्पादकांना दराबाबत स्थिरतेचे वातावरण राहण्यासाठी नाफेडने कांदा खरेदी तसेच साठवणूक याला एजन्सीजच्या माध्यमातून वेग दिला आहे. जेव्हा कांद्याची गरज लागेल त्यावेळी मेट्रोपॉलिटीन सिटी (शहरे) पासून ते विविध पातळ्यावर कांदा ग्राहकांना उपलब्ध करुन देण्याचे धोरण हे व्यापारी,कांदा उत्पादक,निर्यातदार व ग्राहक यांच्या समन्वयासाठी उपयुक्त ठरणार असल्याची माहिती निर्यातदार मनीष बोरा यांनी दिली.