नाफेडचा कांदा दिल्ली, भुवनेश्वरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 12:06 AM2018-10-04T00:06:50+5:302018-10-04T00:07:45+5:30
शेखर देसाई।
लासलगाव : कांदा भावात स्थिरता यावी यासाठी नाफेडने एप्रिल ते आॅगस्ट २०१८ या कालावधीत खरेदी केलेल्या १३ हजार ५०० मेट्रिक टन कांदा आता आठ ते दहा दिवसांपासून दिल्ली, आझादनगर, भुवनेश्वर या ठिकाणी पाठवण्यात येत असल्याची माहिती नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. दरम्यान, सहा महिन्यांपासून हा कांदा खरेदी होत असल्याने त्यामध्ये दररोज होणाऱ्या वातावरणाच्या बदलामुळे १५ ते २० टक्क्यांपर्यंत घट आणि नुकसान होत आहे. ज्यावेळी संपूर्ण चाळीमधून कांदा बाहेर काढण्यात येईल त्यावेळेसच नुकसानीची आकडेवारी समोर येईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
कांद्याच्या भावात चढ-उतार झाल्यानंतर समतोल ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने नाफेड मार्फत कांदा स्थिरीकरण फंड अंतर्गत कांदा खरेदी दर वर्षी करण्यात येते. या वर्षी २५ हजार मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट होते. त्यानुसार नाफेडने साडेतेरा हजार मेट्रिक टन कांदा खरेदी केला होता. तो आता विविध राज्यात नाफेडचे तसेच मद्यथेअरीमार्फत पाठविला जात आहे. कांद्याचे घसरते दर आटोक्यात राहावे व ग्राहकाला योग्य दरात कांदा उपलब्ध व्हावा, या हेतूने तसेच कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने नाफेडमार्फत किंमत स्थिरीकरण निधीच्या माध्यमातून २५ हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात आतापर्यंत तब्बल १३ कोटी रु पये खर्च करून १३ हजार ५०० मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला आहे. शेतमालाच्या दरातील घसरण रोखण्यासाठी केंद्र सरकारने स्वामीनाथन आयोगाने सुचविलेल्या भाव स्थिरीकरण निधी योजनेसाठी मोठी आर्थिक तरतूद केली. त्यातून या वर्षी २५ हजार मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट आहे. घाऊक बाजारात भाव घसरू नयेत, म्हणून नाशिक,नगर, पुणे जिल्ह्यातील बाजार समित्यांमधून नाफेडने हा कांदा खरेदी केला आहे. केंद्र सरकारने नाफेडमार्फत किंमत स्थिरीकरण निधीच्या माध्यमातून खरेदी केलेला कांदा रवाना करण्यासाठी चाळीतून बाहेर काढला जात आहे. यातील वजनातील घट व हवामानाचा परिणाम यामुळे कांदा किती खराब निघतो हे लवकरच समजेल.
- नानासाहेब पाटील
संचालक, नाफेड