नाफेड कांदा घोटाळा चौकशीला आले पथक; गुजरातच्या अधिकाऱ्यांकडून तपास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 06:12 AM2024-09-11T06:12:18+5:302024-09-11T06:12:34+5:30
मागील काही दिवसांपासून नाफेडच्या कांदा खरेदीची यादी व्हायरल झाली असून, त्यामधून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या.
नाशिक - नाफेडमधील काही अधिकारी आणि घोटाळेबाज शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून होत असलेल्या कांदा गैरव्यवहाराची दखल थेट पंतप्रधान कार्यालयाने घेतली असून, त्याच्या चौकशीसाठी गुजरातच्या अधिकाऱ्यांचे पथक पिंपळगाव (बसवंत) येथे दाखल झाले आहे. या पथकाने नाफेडच्या कार्यालयामध्ये जाऊन मंगळवारी सुमारे तीन तास अधिकाऱ्यांची चौकशी केली. तसेच, काही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या पथकाने पाहणी केली.
मागील काही दिवसांपासून नाफेडच्या कांदा खरेदीची यादी व्हायरल झाली असून, त्यामधून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. येवला येथील एका शेतकऱ्याने नाफेडमधील कांदा खरेदीतील घोटाळ्याबाबत थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली.
कोट्यवधी थकले?
नाफेडमार्फत फार्मर प्रोड्युसर कंपन्यांनी खरेदी केलेल्या कांदा मालाचे पैसे बनावट कांदा उत्पादकांच्या खात्यावर वळविले. ज्या शेतकऱ्यांकडून नाफेडने कांदा विकत घेतला, त्यांचे १ कोटी १३ लाख रुपये एका कंपनीने थकविले.