नगरपंचायतीत कामकाज ठप्प
By admin | Published: June 14, 2015 11:26 PM2015-06-14T23:26:55+5:302015-06-15T00:13:38+5:30
आंदोलन : मुख्याधिकारी अद्याप रुजू नाही
कळवण : ग्रामपंचायतचे नगरपंचायत होऊनदेखील प्रशासकामार्फत कामकाज सुरू झाले असले, तरी नगरपंचायतीस अजूनपर्यंत पूर्णवेळ मुख्याधिकारी न मिळाल्याने कामकाज पूर्णत: ठप्प झाले आहे. याबाबत सातत्याने मागणी करण्यात येऊनदेखील मुख्याधिकारी न आल्याने छावा क्रांतिवीर सेनेने गांधीगिरी आंदोलन केले. नगरपंचायतच्या खुर्चीस टोपी, हार घातला.
राज्य शासनाने कळवण ग्रामपालिकेचे रूपांतर नगरपंचायतमध्ये केले आहे. नगरपंचायतच्या कारभारावर नजर ठेवण्यासाठी प्रशासकपदी तहसीलदार अनिल पुरे यांची नियुक्ती केली आहे. गेल्या अडीच महिन्यापासून नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नगरपंचायतच्या कामकाज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अधिकृत कागदपत्रे प्राप्त न झाल्याने कळवण नगरपंचायतचे कामकाज पूर्णत: ठप्प झाल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. विविध दाखले, गटारी दिवाबत्ती, पाण्याची सोय होत नसल्यामुळे ग्रामस्थांना नाहक हाल सहन करावे लागत आहेत; मात्र प्रशासन बसले आहे.
नगरपंचायत लागू झाल्याने सर्व कामकाज हे नगरपंचायतच्या नावानेच करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच कळवण ग्रामपालिकेचे नाव बदलून ते कळवण नगरपंचायत कार्यालय असे करावे तसेच रजिस्टर, सर्व शिक्के, पावत्या व दाखले हे नगरपंचायतच्या नावाने देण्याचे आदेश आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नगरपंचायतचे रजिस्टर, शिक्के व मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक झाली आहे .
ज्या नागरिकांना शासकीय कामकाजासाठी रहिवासी दाखला लागतो आहे, परंतु दाखले मिळत नाही, त्याचप्रमाणे नळपट्टी व इतर कर भरणा करण्यास जाणाऱ्या ग्रामस्थाकडून कर भरणाही करून घेतला जात नसल्याचे काही नागरिकांनी सांगितले. यामुळे ‘नको ती नगरपंचायत, आपली ग्रामपालिकाच बरी’ असे म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. मात्र अशीच परिस्थिती राहिल्यास आठ दिवसांत छावा पद्धतीने आंदोलन करण्यात येउन नगरपंचायतच्या खुर्चीचे अंत्यसंस्कार करण्यात येऊन कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा दिला आहे. यावेळी राजू पगार, अनिल बधान, सागर पगार, राकेश पगार, बंडू पगार, अशोक शिंदे, नाना काकुळते, प्रमोद शिंदे, समाधान शिंदे, स्वप्नील पगार, चेतन पगार, टिनू पगार आदिंसह नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते. (वार्ताहर )