नागासाक्या दुथडी भरुन वाहू लागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 03:19 PM2019-10-22T15:19:39+5:302019-10-22T15:19:48+5:30
नांदगाव : सम्ततधार पावसामुळे तालुक्यातील मध्यम प्रकल्पातील नाग्यासाक्या धरण ओसंडून वाहू लागल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे
नांदगाव : सम्ततधार पावसामुळे तालुक्यातील मध्यम प्रकल्पातील नाग्यासाक्या धरण ओसंडून वाहू लागल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी झालेल्या पावसामुळे तालुक्यातील माणिकपुंज धरणासह अन्य लहान बंधारे भरून वाहू लागले असले तरी नाग्यासाक्या धरणात मात्र अपेक्षति असा जलसंचय झालेला नव्हता. मात्र, झालेल्या पावसाने धरण ओव्हर फ्लो झाल्याने लाभधारक शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे. पावसाळ्याच्या शेवटी दमदार पावसाने नाग्यासाक्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील जलस्त्रोत वाहू लागल्याने गेल्या तीन वर्षांपासून न भरलेले नाग्यासाक्या धरण अखेरीस भरले. धरणाच्या सांडव्यावरून पाण्याने पांझण नदीच्या पात्राकडे झेप घेतली. नाग्यासाक्या धरण भरले नसल्याने डाव्या उजव्या कालव्यावरील सिंचनक्षेत्राला आवर्तन देतांना जलसंपदा विभागाला काटकसर करावी लागत होती. पिण्याच्या पाण्याचे आरक्षण त्यात असल्यामुळे तालुक्याच्या बहुतांशी ग्रामीण भागाला टँकरने पाणीपुरवठा याच धरणाच्या मृत साठयातून होत असे. धरणात सध्या मोठ्या प्रमाणात साचलेला गाळामुळे पिण्याच्या पाण्याचाही पुरवठा अशुद्ध असा होत असे. शनिवारी नाग्यासाक्या परिसरातील पावसामुळे अखेर धरण भरले. आता पांझण नदी वाहू लागली आहे नदीकाठच्या विहिरी व अन्य लहान मोठ्या पाणी योजनांना त्यामुळे मोठा आधार झाला आहे. मालेगाव तालुक्यातील जेऊर, पाथर्डे, साकोरी, मळगाव, निमगुले आदी तर नांदगाव तालुक्यातील वाखारी, पिंप्राळे, साकोरा आदी गावांतील एकूण दोन हजार हेक्टरातील सिंचन क्षेत्राला या धरणाच्या पाण्यामुळे लाभ होणार आहे.