नाग्या-साक्याचे पाणी फक्त पिण्यासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 06:33 PM2018-09-08T18:33:06+5:302018-09-08T18:33:46+5:30
नाग्या-साक्या धरणात मृतपाण्याचा साठा असून, ते पाणी फक्त पिण्यासाठीच वापरावयाचे असल्याने त्यात गणपती विसर्जन करू नये या जलसंपदा विभागाच्या सूचनेनुसार यंदाचे गणपती विसर्जन नाग्या साक्यामध्ये करावयाचे नाही. असा महत्त्वपूर्ण निर्णय शांतता समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
नांदगाव : नाग्या-साक्या धरणात मृतपाण्याचा साठा असून, ते पाणी फक्त पिण्यासाठीच वापरावयाचे असल्याने त्यात गणपती विसर्जन करू नये या जलसंपदा विभागाच्या सूचनेनुसार यंदाचे गणपती विसर्जन नाग्या साक्यामध्ये करावयाचे नाही. असा महत्त्वपूर्ण निर्णय शांतता समितीच्या बैठकीत घेण्यात आला. नगराध्यक्ष राजेश कवडे, पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी त्याला दुजोरा देत सर्व गणेश मंडळांना आवाहन केले. सहायक पोलीस अधीक्षक रागीसुधा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी शहरातील गणेश मंडळांनी मोठ्या मूर्तीचे यंदा विसर्जन करू नये. प्रत्येक मंडळाने मोठ्या मूर्ती घेतल्या असतील तर सोबत अर्ध्या फुटापेक्षा छोट्या मूर्ती घ्याव्यात व त्या मूर्तींचे प्रतीकात्मक विसर्जन करावे. त्यासाठी गणेशकुंड नगरपालिका तयार करून देईल. तसेच मोठ्या मूर्ती वर्षभर जतन करण्यासाठी नगरपालिका मदत करेल, असे आवाहन केले. नगराध्यक्ष कवडे यांच्या सूचनेचे स्वागत करण्यात आले.
पोलीस ठाण्यात शहरातील विविध गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. शहरातील मूर्तींचे नाग्या-साक्या धरणात विसर्जन करण्याची प्रथा होती. ती यावर्षी खंडित झाली आहे. नाग्या-साक्या धरणातून जेमतेम शिलकी जलसाठ्यातून चांदवड-नांदगाव तालुक्यातील ४२ गावांच्या नळ योजनेसाठी पाणीपुरवठा केला जातो. तसेच टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जातो, अशी माहिती कर्मचारी नितीन धीवर यांनी या बैठकीत दिली होती. हा धागा पकडीत नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी शहरातील मंडळांच्या कार्यकर्त्यांना गणेश विसर्जन करण्यासाठी मौलिक सूचना उपस्थित कार्यकर्त्यांना केली. त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. बाळासाहेब कवडे, संतोष गुप्ता, सुमित सोनवणे, योगेश सोनार, विशाल वडघुले आदींनी विविध सूचना केल्या. गेल्या वर्षी आयोजित गणेशमूर्ती स्पर्धेचे बक्षीस वितरण सहायक पोलीस अधीक्षक रागी सुधा, नगराध्यक्ष राजेश कवडे, ज्येष्ठ नागरिक मेजर जगन्नाथ साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले. पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी गणेशोत्सव काळात पालन करण्यासंबंधीच्या सूचना देताना ध्वनी पातळी ५५ ते ६० डेसिबल्स राखावी व मार्गदर्शक तत्त्वानुसार वेळ पाळण्याचे आवाहन केले. राजीव गांगुर्डे यांनी सूत्रसंचालन केले.