नाशिकच्या १७ खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 07:21 PM2018-02-12T19:21:50+5:302018-02-12T19:37:02+5:30
क्रीडा क्षेत्रात सर्वाेच्च समजल्या जाणाऱ्या राज्य शासनाच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, या पुरस्कारांमध्ये नाशिकमधील विविध खेळांच्या १७ खेळाडूंचा समावेश आहे
नाशिक : क्रीडा क्षेत्रात सर्वाेच्च समजल्या जाणाऱ्या राज्य शासनाच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, या पुरस्कारांमध्ये नाशिकमधील विविध खेळांच्या १७ खेळाडूंचा समावेश आहे. गेल्या काही वर्षात नाशिकमध्ये क्रीडाक्षेत्राला लाभलेल्या पोषक वातावरणामुळे नाशिकचे नाव क्रीडा क्षेत्रात गाजत असून, सर्वच क्रीडा प्रकारांत नाशिकने लौकिक प्राप्त केला आहे. त्यामुळे यंदा या यादीत नाशिकच्या १७ खेळाडूंची नावे आहेत. यामध्ये धावपटू संजीवनी जाधव, बुद्धिबळपटू विदित गुजराथी, सायकलपटू महाजन बंधू यांचा समावेश आहे. शुटिंगचे तीन पुरस्कार नाशिकला प्राप्त झाले असून, फेन्सिंगच्या दोघा खेळाडूंना छत्रपती पुरस्काराचा सन्मान मिळाला आहे. गत तीन वर्षांसाठींचे हे पुरस्कार आहेत.
राज्य शासनाच्या क्रीडा विभागाच्या वतीने राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये खेळाडू आणि क्रीडा संघटकांचा समावेश आहे. नाशिकच्या क्रीडाविश्वात उभरत्या खेळाडूंनी क्रीडा जगताचे लक्ष वेधले असून, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील नाशिकचा नावलौकिक उंचावला आहे. राज्य शासनानेदेखील नाशिकच्या खेळाडूंची दखल घेत या खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
पुरस्कारप्राप्त खेळाडूंमध्ये प्रज्ञा गद्रे (बॅडमिंटन), विदित गुजराथी (बुद्धिबळ), दत्तू भोकनळ (रोर्इंग), शरयू पाटील (फेन्सिंग), अस्मिता दुधारे (फेन्सिंग), श्रेया गावंडे, श्रद्धा नलमवार, अक्षय अष्टपुत्रे (शुटिंग), संतोष कडाळे (रोर्इंग), संजीवनी जाधव (अॅथेलेटिक्स), तर प्रशिक्षक राजू शिंदे (फेन्सिंग), विजेंद्रसिंग (अॅथलेटिक्स), गलांडे (शरीरसौष्ठव), अंबादास तांबे (रोर्इंग) यांना पुरस्कार जाहीर झाले आहे, तर क्रीडा संघटक पुरस्कार अविनाश खैरनार, तर महाजन बंधूंना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर झाले आहेत.
राज्य शासनाच्या वतीने या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, मुंबईत एका शानदार सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर खेळाडू तसेच संघटक म्हणून भूमिका बजविणाऱ्या नाशिकच्या १७ जणांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या खेळाडूंना पुरस्कार जाहीर झाल्याने क्रीडाक्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.