चिप एटीएम कार्डामुळे वाढल्या अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 04:54 PM2019-01-13T16:54:00+5:302019-01-13T16:55:29+5:30
नाशिक : सुरक्षिततेच्या कारणास्तव रिझर्व्ह बॅँकेच्या आदेशाने मॅग्नेटिक एटीएम कार्ड बंद करून आता चिपवाले एटीएम कार्ड सुरू करण्यात आले ...
नाशिक : सुरक्षिततेच्या कारणास्तव रिझर्व्ह बॅँकेच्या आदेशाने मॅग्नेटिक एटीएम कार्ड बंद करून आता चिपवाले एटीएम कार्ड सुरू करण्यात आले आहेत. हजारो ग्राहकांना बॅँकांच्या माध्यमातून अशाप्रकारचे नवे चिपवाले कार्ड वितरित करण्यात आलेले आहे. मात्र बाजारात स्वॅप मशीनवर हे कार्ड प्रतिसाद देत नसल्याने ग्राहकांच्या अडचणी वाढल्या आहेत. नव्या कार्डामुळे ग्राहकांच्या सुरक्षिततेपेक्षा कार्डाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जुन्या एटीएम कार्डातील रकमेच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाल्याने रिझर्व्ह बॅँकेच्या आदेशाने ग्राहकांना चीपवाले एटीएम कार्ड पुरविले जात आहे. मात्र या कार्डामुळे सोय होण्याऐवजी गैरसोयच अधिक झाली आहे. बाजारातील स्वॅप मशाीनमध्ये नव्या कार्डाला अडचणी येत आहेत. सातत्याने स्वॅपचा प्रयत्न करूनही कार्ड वापरात येत नसल्यामुळे ग्राहकांची गैरसोय वाढली आहे.
शासनाच्या आदेशानुसार ग्राहकांनी बॅँकेत जाऊन आपल्या नावाचे नवीन चिपवाले कार्ड आणले आहेत. परंतु या चीपच्या कार्डमुळे ग्राहकांना पैसे उपलब्ध करण्यास मोठी कसरत करावी लागत आहे. शहरातील तसेच महामार्गावरील अनेक पेट्रोलपंपचालकाकडे कार्ड स्वॅप केल्यानंतरही पैसे खात्यातू कट होत नसल्याचे वादाचे प्रसंगदेखील निर्माण झाले आहेत. हॉटेल्समध्येदेखील चीपवाले कार्ड स्वॅप होत नसल्याचे चित्र आहे. नवे कार्ड बाजारात आल्यापासून कार्ड स्वॅप करण्याच्या अडचणी वाढल्या असल्याचे सांगितले जाते.