नायगाव घाटात कामगारास अडवून लूट; सिनेस्टाईल पाठलाग अयशस्वी ठरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2023 12:07 PM2023-07-23T12:07:10+5:302023-07-23T12:07:31+5:30
सिन्नरहून देशवंडीकडे पीकअप ने घरी जाणाऱ्या रवी मेंगाळ या तरूणाच्या हा प्रकार लक्षात आला.
दत्ता दिघोळे
नायगाव ( सिन्नर ) - तालुक्यातील नायगाव घाटात शनिवारी ( दि.२२ ) रात्री माळेगाव एमआयडीसीतील कामगारास आडवून चोरट्यांनी लुटल्याची घटना घडली. शेतकरी प्रवाशाने चोरट्यांचा सिनेस्टाईल पाठलाग केल्याने चोरटे मोटारसायकल सोडून पळून जाण्यात यशस्वी झाले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की तालुक्यातील सोनगिरी येथिल संजय उर्फ सजन विठोबा लहाने हे माळेगाव एमआयडीसीतील गँस कंपनीतून सुट्टी झाल्यानंतर रात्री ९ वाजेच्या दरम्यान घराकडे निघाले होते.सिन्नर - नायगाव रस्त्यावरील घाटातील शेवटच्या वळणावर असतांना एका मोटारसायकलवर आलेल्या तीघांनी त्यांना आवाज देत थांबण्यास सांगितले मात्र त्यांनी न थांबता गाडीचा वेग कमी केला.एवढया वेळेत अज्ञात चोरट्यांनी त्यांना अडवून झटापटी केली.त्यांच्या खिशातील पंधरा हजार रूपये व मोबाईल हिसकावून घेतला.
दरम्यान सिन्नरहून देशवंडीकडे पीकअप ने घरी जाणाऱ्या रवी मेंगाळ या तरूणाच्या हा प्रकार लक्षात आला.त्याने पळून जाणाऱ्या चोरट्यांच्या गाडीचा सिनेस्टाईल पाठलाग केला.सुमारे दोन किलोमीटर अंतर पार केल्यानंतर आव्हाड वस्तीवरील वळणावर चोरट्यांच्या गाडीला ओव्हरटेक केले.आपल्याला पकडले जाण्याच्या भीतीने तीघा चोरट्यांनी मोटारसायकल ( क्रमांक एम.एच.-१५ -बी.वाय.९२७९ )
सोडून चोरट्यांनी तेथून डोंगराच्या दिशेने पळ काढला.चोरट्यांनी सोडून दिलेली पल्सर ही चोरीची असल्याचे कळते.अधिक तपास एमआयडीसी पोलिस करत आहे. दरम्यान घडलेल्या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना कळताच पोलिस निरीक्षक श्याम निकम यांनी घटनास्थळी धाव घेतली.परिसरात शोधाशोध केली मात्र चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले.
नायगाव घाटात मोटारसायकलस्वारांना आडवून लुटण्याच्या घटना वाढू लागल्याने कामगाव व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या घटनेची माहिती परिसरात सोशलमिडीयाच् माध्यमातून कळताच खळबळ उडाली.या परिसरातील शेतकऱ्यांनी संपूर्ण रात्र जागुन काढली.