नाईक शिक्षण संस्था सभा : भूखंड विक्रीतून मिळणार २६ कोटी, संचालकांमध्ये धक्काबुक्की
By admin | Published: December 21, 2014 01:00 AM2014-12-21T01:00:47+5:302014-12-21T01:08:40+5:30
नाईक शिक्षण संस्था सभा : भूखंड विक्रीतून मिळणार २६ कोटी, संचालकांमध्ये धक्काबुक्की
नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गंगापूररोडवरील संस्थेच्या मालकीची ४४ गुंठे जागा विक्री करण्याचा निर्णय बहुमताने आवाजी पद्धतीने मंजूर करण्यात आला. या भूखंड विक्रीला मनोज बुरकुल यांनी विरोध दर्शविल्यानंतर झालेल्या शाब्दिक चकमकीचे रूपांतर संचालक प्रकाश घुगे यांनी बुरकुलला केलेल्या धक्काबुक्कीत झाले. त्यामुळे सभेत काही वेळ गोेंधळ निर्माण झाला होता.
दरम्यान, या भूखंड विक्रीवरून सभेत काही आजी-माजी संचालकांनी मते नोेंदवित आवश्यक ती काळजी घेऊन भूखंड विक्रीबाबत सहमती दर्शविली. डोंगरे वसतिगृहाजवळील संस्थेच्या इमारतीत या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या सुरुवातीलाच मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. सरचिटणीस हेमंत धात्रक मागील सभेचे इतिवृत्त व वार्षिक अहवालाचे वाचन केले. सभा कायदेशीर आहे काय? अशी विचारणा पंढरीनाथ थोरे यांनी केली, तर माजी अध्यक्ष तुकाराम दिघोळे यांनी वार्षिक अहवालात पान नं ०३ सह अन्य काही पानांवर घोडचुका असल्याचे निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. दिघोळे यांनीही वार्षिक सर्वसाधारण सभा घेता येत नाही, फार तर विशेष सभा म्हणून ही सभा घेता आली असती, असे सांगत संचालक मंडळावर ताशेरे ओढले. लक्ष्मण सांगळे यांनी मागील सभेचे इतिवृत्त देताना माजी अध्यक्षांचे नाव कसे? अशी विचारणा केली. त्यावर अध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांनी उपस्थितांनी केलेल्या सूचनांनुसार चुका टाळून वार्षिक अहवालात दुरुस्ती केली जाईल, मात्र हा अहवाल मागील संचालक मंडळाचाच असल्याकडे लक्ष वेधले.त्यानंतर कोंडाजी आव्हाड यांनी संस्थेवर असलेल्या एकूण कर्जाची माहिती दिली. १८ कोटींचे संस्थेवर बॅँकेचे कर्ज असून, संस्थेच्या इमारती पोटी केलेल्या बांधकामांचे चार कोटी कंत्राटदारांचे देणे असल्याचे सांगितले. संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून सर्व खर्च जाता वर्षाकाठी २५लाख, तंत्रनिकेतन महाविद्यालयाकडून ६० लाख, अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून ६० लाख असे वर्षाकाठी सुमारे सव्वा कोटींचे उत्पन्न मिळते. मात्र १८ कोटींच्या बॅँकेचा हप्ता वर्षाला ५ कोटी २० लाख रुपये अदा करावा लागत असल्याने संस्थेची नाजूक परिस्थिती पाहता संस्थेच्या मालकीचा भूखंड विक्रीचा निर्णय सर्व आजी-माजी पदाधिकारी व ज्येष्ठांच्या सल्ल्याने घेतला. त्यासाठी चार वेळा निविदा मागविण्यात आल्याचे व सर्वाधिक बोली २६ कोटी ११ लाखांची आल्याचे सांगत यासाठीचा प्रस्ताव धर्मदाय आयुक्तांकडे पाठविण्यासाठी सभासदांनी मंजुरी द्यावी, अशी विनंती केली. त्यावर सुनील केदार, पंढरीनाथ थोरे, दराडे, अॅड. पी. आर. गिते यांनी सूचना केल्या. त्यात भूखंड विक्रीसाठी राबविण्यात आलेल्या निविदापद्धतीवर व अटी-शर्तींमध्ये त्रुटी असल्याचे अॅड. पी.आर. गिते यांनी सांगितले, तर केदार व थोरे यांनी भूखंड विक्रीला सहमती दर्शविली, मात्र ५० टक्केरकमेतून नवीन जागा घेण्याबरोबरच विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना केल्या. मनोज बुरकुल यांनी आजी-माजी संचालकांवर निवडणुकीच्या काळात संस्थेची एक इंचही जागा विकू न देण्याच्या आश्वासनाचे काय झाले? हा प्रकार समाजाची दिशाभूल करण्याचा असल्याचे सांगून संचालकांवर तोंडसुख घेण्याचा प्रयत्न करताच शिवसेना नाशिक तालुका प्रमुख व संस्थेचे संचालक प्रकाश घुगे यांनी मनोज बुरकुल यांना तोंड सांभाळण्यास सांगत धक्काबुक्की केली. त्यानंतर दुसरे संचालक संपत वाघ व अशोक धात्रक यांनी मनोेज बुरकुलला व्यासपीठाकरून दुसरीकडे नेले. त्याचवेळी विश्वस्त बाळासाहेब गामणे यांनी राष्ट्रगीत सुरू करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा गोेंधळ उडून नंतर सर्व संचालक व सभासद यांच्यातील गोेंधळ मिटल्यानंतर सभा पुन्हा सुरू झाली. यावेळी मनोज बुरकुल यांना झालेल्या धक्काबुक्कीबाबत अध्यक्ष कोंडाजी आव्हाड व संचालक प्रकाश घुगे यांनी दिलगिरी व्यक्त केली. प्रल्हाद पाटील कराड यांनी मार्गदर्शन करताना संस्थेपुढील अडचणींचा पाढा वाचला. त्यानंतर आवाजी मतदानाने भूखंड विक्रीच्या विषयासह सर्व विषय मंजूर करण्यात आले. जे.डी. केदार यांनी भूखंड विक्रीला आपला विरोध राहील, असे सांगितले.
गोंधळातच राष्ट्रगीत होऊन सभा संपली. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर धात्रक, सहचिटणीस तानाजी जायभावे, विश्वस्त विठ्ठलराव पालवे, दामोदर मानकर, बबनराव सानप, संचालक माणिक सोनवणे, महेश आव्हाड, गोकुळ काकड, सुदामभाऊ नवाळे, रामनाथ नागरे, बाळासाहेब चकोर, हेमंत नाईक, भगवान सानप, विजय इप्पर, यशवंत दरगोेडे, शरद बोडके, कविता मानकर, शैलेजा बुरकुल आदिंसह सभासद उपस्थित होते. (प्रतिनिधी)