नाईकवाडीपुरा नवा हॉटस्पॉट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 10:18 PM2020-06-10T22:18:59+5:302020-06-11T00:56:06+5:30
नाशिक : शहरातील कॉलनी रोड परिसरात एक-दोन रुग्ण ठीक; परंतु दाट वस्तीच्या भागात रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत असल्याने महापालिकेच्या सर्व यंत्रणा सजग झाल्या आहेत. वडाळापाठोपाठ अन्य शिवाजीवाडी आणि क्रांतीनगरप्रमाणेच आता जुने नाशिक भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत.
नाशिक : शहरातील कॉलनी रोड परिसरात एक-दोन रुग्ण ठीक; परंतु दाट वस्तीच्या भागात रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत असल्याने महापालिकेच्या सर्व यंत्रणा सजग झाल्या आहेत. वडाळापाठोपाठ अन्य शिवाजीवाडी आणि क्रांतीनगरप्रमाणेच आता जुने नाशिक भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. केवळ नाईकवाडीपुरा या एकाच भागात गेल्या तीन ते चार दिवसात पंचवीसहून अधिक रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता हा संपूर्ण भागाच सील करण्यात येणार असून, वडाळा पॅटर्न राबविण्यात येणार आहे.
शहरातील दाट वस्तीत एक बाधित सापडल्यानंतर त्याच्या संपर्कातून होणारी वाढ रोखता येत नाही. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडतात. सातपूर-अंबड लिंकरोडवरील एका
दाट वस्तीतील वृद्धाच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला होता. त्यापाठोपाठ वडाळा येथे एका ट्रकचालकास संसर्ग झाल्याचे आढळले आणि नंतर एकापाठोपाठ रुग्णसंख्या वाढत गेली. क्रांतीनगर येथे तर मार्केट कमिटीत काम करणाºया हमालाला लागण झाल्यानंतर या भागातदेखील पंधरा ते वीस रुग्ण आढळल्याने हा परिसरच सील करावा लागला होता. शिवाजीवाडी परिसरातदेखील असाच प्रकार घडला होता. जुन्या नाशिकमध्ये कुंभारवाड्यात एक रुग्ण बाधित असल्याचे आढळले. त्यानंतर आता अमरधाम रोड, आझादनगर, नाईकवाडीपुरा अशा सर्वच भागात रुग्णसंख्या वाढत आहे. नाईकवाडीपुरा भागात तर पंचवीसपेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे वडाळा परिसराप्रमाणेच या भागावरदेखील लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
येथील प्रतिबंधित क्षेत्रात महापालिकेच्या पथकाच्या वतीने तपासणी सुरू करण्यात आली आहे. मात्र, त्याचबरोबर सर्व भाग महापालिकेच्या वतीने निर्जंतुक करतानाच दुकानदारांनादेखील
दर दोन ते तीन तासांनी
जंतुनाशक फवारणी करण्यास सांगण्यात आले आहे. मंगळवारी (दि.९) तर महापालिकेबरोबरच पोलिसांनीदेखील नागरिकांना अकारण बाहेर पडू नये, अशा
प्रकारे सूचना देतानाच मास्क लावण्यासदेखील सांगितले
आहे.
-------------------------
नाकेबंदी; परिसर सील करणार
दाट वस्तीच्या वडाळा भागात महापालिकेने सर्व भाग सील करून हा भाग पिंजून काढला होता. त्यानंतर या भागात आता गेल्या दोन ते तीन दिवसात एकही नवीन बाधित आढळलेला नाही. त्याच पद्धतीने आता नाईकवाडीपुरा भाग सील करण्यात येणार आहे.