वतनाच्या जमिनींमध्ये ‘नजराणा’ घोटाळा
By admin | Published: March 7, 2017 01:13 AM2017-03-07T01:13:14+5:302017-03-07T01:13:26+5:30
नाशिक : बागलाण, कळवण व सुरगाणा या तीन तालुक्यांतही तत्कालीन प्रांत अधिकाऱ्यांनी इनाम वतनाच्या जमिनींच्या व्यवहारांना बेकायदेशीर परवानगी देऊन शासनाचे नुकसान केल्याची तक्रार करण्यात आली आहे.
नाशिक : नांदगाव तालुक्यात नवीन शर्तीच्या जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारात शासनाच्या नजराणा रकमेच्या फसवणुकीचे प्रकरण ताजे असतानाच बागलाण, कळवण व सुरगाणा या तीन तालुक्यांतही तत्कालीन प्रांत अधिकाऱ्यांनी इनाम वतनाच्या जमिनींच्या व्यवहारांना बेकायदेशीर परवानगी देऊन शासनाचे नुकसान केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नांदगावच्या प्रकरणात ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, त्या अॅड. शिवाजी सानप यांनीच ही तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे करून त्यांना पेचात पकडले आहे.
यासंदर्भात गेल्या आठवड्यातच अॅड. सानप यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून कारवाईची मागणी केली असून, तसे न झाल्यास थेट उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे. इनाम वर्ग ६ ब च्या महार वतनाच्या जमिनींची खरेदी-विक्री करावयाची झाल्यास त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल व कूळ कायदा शाखेची अनुमती घेणे जमीन महसूल अधिनियमान्वये अनिवार्य आहे. अशा जमिनीच्या खरेदी, विक्रीची परवानगी देताना चालू बाजारभावाच्या ५० टक्के रक्कम नजराणा म्हणून शासनाच्या तिजोरीत भरणे क्रमप्राप्त आहे. असे असतानाही कळवणच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी महसूल शाखेची अनुमती न घेता आपल्या अधिकारातच या जमिनींच्या खरेदी, विक्री व्यवहाराला ना हरकत दाखला देऊन शासनाच्या महसुलाचे नुकसान केल्याचे सानप यांनी पत्रात म्हटले आहे. या तक्रारीच्या पृष्ठ्यर्थ सानप यांनी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी बागलाण, कळवण व सुरगाणा तहसीलदारांना यासंदर्भात सन
२०१४ मध्ये दिलेले पत्रही सादर केले आहे.
अॅड. सानप यांच्या तक्रारीमुळे पुन्हा एकवार महसूल व लाचलुचपत प्रतिबंधक खात्यात खटके उडण्याची शक्यता निर्माण झाली असून, नांदगावच्या नवीन शर्तीच्या जमीन व्यवहारात शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा नजराणा बुडवून फसवणूक व रकमेचा अपहार केल्याच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने जानेवारीत प्रांत, तहसीलदारासह २३ व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात अॅड. सानप यांच्यासह त्यांच्या दोन्ही पुत्रांना सह आरोपी करण्यात आलेले आहे. या गुन्ह्णात सानप यांच्यासह सर्वच संशयितांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केले आहे.