जिल्ह्यातील संपात शंभर टक्के कर्मचाऱ्यांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 06:45 PM2020-01-08T18:45:50+5:302020-01-08T18:47:37+5:30
नाशिक : केंद्र सरकार कामगार विरोधी धोरण घेत असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याने केंद्राच्या या धोरणाला विरोध ...
नाशिक : केंद्र सरकार कामगार विरोधी धोरण घेत असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याने केंद्राच्या या धोरणाला विरोध करण्याबरोबरच कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी बुधवारी (दि.८) नाशिकमध्येहीसंप पुकारण्यात आला. यावेळी हजारो कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढून केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. कामगार संघटनांच्या कृती समितीने पुकारलेल्या या संपात हजारोंच्या संख्येने कर्मचारी सहभागी झाल्याने शासकीय कामकाज ठप्प झाले होते. दरम्यान, या संपात शासकीय आणि निमशासकीय तसेच कंत्राटी कर्मचाºयांचा शंभर टक्के सहभाग असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठविला आहे.
बुधवारी (दि.८) कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपात राज्य सरकारी कर्मचारीदेखील सहभागी झाले होते. या संपात जिल्ह्यातील ५० हजारांहून अधिक शासकीय, निमशासकीय सेवेतील कामगार सहभागी झाले होते. गोल्फ क्लब मैदान येथून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सहभागी झालेल्या कर्मचाºयांनी केंद्र शासनाविरोधात तीव्र निषेधाच्या घोषणा दिल्या. शिवाजीरोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे या मोर्चाचा समारोप करण्यात आला. यावेळी कामगार प्रतिनिधींनी तीव्र भावना व्यक्त करीत या संपाने केंद्राला जाग आली नाही, तर बेमुदत संपाचा इशारा दिला.
कामगार वाचविण्यासाठी अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनात कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशव्यापी आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार विविध क्षेत्रातील कामगार संघटनांनी एकत्र येत बुधवारी देशव्यापी संप पुकारला. कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात नाशिक जिल्ह्यातील कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपात जिल्ह्यातील विविध कामगार संघटनांचे कर्मचारी सहभागी झाले होते. जिल्ह्यातील राज्य आणि केंद्र सरकारी कर्मचारी, खासगी उद्योगातील कामगार, कंत्राटी कर्मचारी, असंघटित क्षेत्रातील कामगार आणि अधिकारी संघटना सहभागी झाल्या होत्या.