हजारो मुस्लीम बांधवांचे नमाजपठण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:48 AM2018-06-17T00:48:03+5:302018-06-17T00:48:03+5:30
बंधुभाव, सामाजिक बांधिलकीची शिकवण देणारा इस्लामी संस्कृतीचा महान सण रमजान ईद शनिवारी (दि.१६) शहरात अभूतपूर्व उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यानिमित्त हजारो मुस्लीम बांधवांनी एकत्र येत सकाळी विशेष नमाज ऐतिहासिक शहाजहॉँनी ईदगाह मैदानावर अदा केली. शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली पार पडलेल्या या सोहळ्याने डोळ्यांचे पारणे फेडले.
नाशिक : बंधुभाव, सामाजिक बांधिलकीची शिकवण देणारा इस्लामी संस्कृतीचा महान सण रमजान ईद शनिवारी (दि.१६) शहरात अभूतपूर्व उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यानिमित्त हजारो मुस्लीम बांधवांनी एकत्र येत सकाळी विशेष नमाज ऐतिहासिक शहाजहॉँनी ईदगाह मैदानावर अदा केली. शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली पार पडलेल्या या सोहळ्याने डोळ्यांचे पारणे फेडले.सकाळी ८.३० वाजेपासून मैदानाच्या दिशेने समाजबांधवांची पावले चालत होती. पारंपरिक पठाणी कुर्ता, डोक्यावर इस्लामी फेटा, टोपी परिधान करून विशेष श्लोक (तस्बीह) पठण करत घरातून मुस्लीम बांधव ईदगाहच्या दिशेने निघाले. ईदगाह मार्गावर विविध लोकप्रतिनिधींसह राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या वतीने शुभेच्छा फलक लावण्यात आले होते. बहुतांश ज्येष्ठ नागरिकांनी नातवंडांसोबत ईदगाहवर हजेरी लावली. मैदानाच्या दोन्ही प्रवेशद्वारावर शुचिर्भूत होण्यासाठी महापालिकेच्या वतीने पाण्याची मुबलक व्यवस्था करण्यात आली होती. नऊ वाजेच्या सुमारास हाजी सय्यद मीर मुख्तार यांनी ईदगाहवर प्रवचनास प्रारंभ केला. रमजान पर्वमध्ये केलेली उपासना सार्थकी लागावी, यासाठी त्यांनी यावेळी धनिक मुस्लिमांना नमाजपठणापूर्वी ‘जकात’, ‘फित्रा’ देण्याचे आवाहन केले. देशाच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी एकात्मता अधिकाधिक बळकट करावी, असे त्यांनी यावेळी सांगितले.