‘ईडी’च्या नावाने तीघांना भामट्यांनी घातला लाखोंना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 03:56 PM2019-09-04T15:56:38+5:302019-09-04T15:59:03+5:30
तिघांना चक्क ‘ईडी’ नावाच्या बनावट कंपनीद्वारे सहा लाख रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
नाशिक : ‘ईडी’ शब्द सध्या सर्वत्र चांगलाच गाजत आहे. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या चौकशीनंतर ‘ईडी’ अधिकच प्रकाशझोतात आली. सोशलमिडियावरही ‘ईडी’च्या अधारे विविध पोस्ट व्हायरल झाल्या. अनेकांनी ‘ईडी’ शब्दाचा प्रयोग करून चक्क विनोदही सोशल मिडियावर रंगविले. एकूणच मागील महिनाभरापासून ‘ईडी’ची चर्चा असल्याने सिन्नर तालुक्यातील दोघा भामट्यांनी सुध्दा ‘ईडी’नावाचा आधार घेत एक ‘ईडी हेल्पिंग लाइन’ नावाच्या बनावट कंपनीद्वारे तीघांना लाखो रूपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
दामदुप्पट रकमेच्या आमिषापोटी अद्यापही नागरिक आपली आर्थिक फसवणूक करून घेत आहे. मंदी असो किंवा तेजी कोणीही स्वत:चे आर्थिक नुकसान करून कधीही इतरांना जादा लाभ करून देत नाही, हे सर्वश्रुत आहे. तरीदेखील आमिषाला बळी पडून नागरिक लाखो रुपयांची गुंतवणूक करत बळी पडत आहे. दोघा भामट्यांनी अशाचप्रकारे तिघांना चक्क ‘ईडी’ नावाच्या बनावट कंपनीद्वारे सहा लाख रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत भद्रकाली पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सिन्नर तालुक्यातील वावी गावातील दोघे संशयित सतीश बनसोडे (३५) व सचिन वेलजाले (३६) यांनी फिर्यादी सीमा भाऊसाहेब काळे (३२, रा. आळे फाटा, नारायणगाव) यांच्यासह संदीप काठे, संदीप लामखेड यांना प्रत्येकी अनुक्रमे २ लाख, ३ लाख आणि १ लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. यासाठी दोघा भामट्यांनी त्यांना ‘ईडी हेल्पिंग लाइन’ नावाच्या बनावट कंपनीद्वारे दामदुप्पट रक्कम केवळ आठ दिवसात देण्याचे आमिष दाखविले. तिघांचा विश्वास संपादन करून या भामट्यांनी फिर्यादी काळे यांच्यासह काठे व लामखेडे यांच्याकडून गुंतवणुकीची रक्कम ‘गुगल पे’द्वारे आॅनलाइन स्वत:च्या खात्यात जमा करून घेतली. यानंतर तिघा पीडितांनी त्यांच्याशी आठवडाभरानंतर वारंवार संपर्क साधला; मात्र संबंधित दोघा भामट्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे यांच्या लक्षात आले. काळे यांनी भद्रकाली पोलीस ठाणे गाठून संशयित दोघांविरुध्द फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी बनसोडे व वेलजाले यांच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक वºहाडे करीत आहेत.