थोरलेपणाच्या सातबाऱ्यावर भाजपाचे नाव; शिवसेनेच्या वाट्याला सानपण!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 04:38 PM2019-09-18T16:38:50+5:302019-09-18T16:44:29+5:30
महाराष्ट्रात १९९२ च्या सुमारास शिवसेना-भाजपाची युती झाली आणि १९९५ ची निवडणूक पहिल्यांदा दोघांनी एकत्र लढली.
- धनंजय वाखारे
नाशिक : राजकारणात कोणी छोटा अन् मोठा नसतो. महाराष्ट्राच्या राजकारणात युतीचा फॉर्म्युला सेना-भाजपाच्या रूपाने राबविला गेला आणि भाजपाला धाकला भाऊ मानत १९९५ ते २००९च्या विधानसभा निवडणुकांपर्यंत थोरलेपण मिरवून घेणाऱ्या शिवसेनेला आता जागावाटपात सानपण घेण्याची नामुष्की ओढवली आहे, ती जनाधार टिकवून ठेवता न आल्याने. गेल्या सहा निवडणुकांकडे दृष्टिक्षेप टाकला, तर भाजपाचा मतांचा टक्का वाढत जात असताना शिवसेनेच्या जनाधारात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत नाही.
महाराष्ट्रात १९९२ च्या सुमारास शिवसेना-भाजपाची युती झाली आणि १९९५ ची निवडणूक पहिल्यांदा दोघांनी एकत्र लढली. त्यावेळी भाजपने ११६ जागा लढत ६५ जागा जिंकल्या. भाजपाच्या २५ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली, तर एकूण मतांची टक्केवारी १२.८० होती. तर शिवसेनेने १६९ जागा लढत ७३ जागा जिंकल्या. सेनेच्या ६० उमेदवारांची अनामत जप्त झाली, तर मतांची टक्केवारी १६.३० टक्के होती. त्यावेळी युती पहिल्यांदा सत्तेवर आली. १९९९ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाने ११७ जागा लढत ५७ ठिकाणी विजय संपादन केला. त्यावेळी भाजपाच्या पारड्यात १४.५४ टक्के मते पडली होती. शिवसेनेने १६१ जागा लढत ६९ जागा जिंकल्या होत्या. त्यांच्या २८ उमेदवारांची अनामत जप्त होऊन त्यांनी १७.३३ टक्के मते घेतली होती.
२००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाने १११ जागांवर उमेदवारी करत ५४ जागा जिंकल्या. त्यावेळी १० उमेदवारांची अनामत जप्त होत मतांची टक्केवारी १३.६७ टक्के होती. शिवसेनेने १६३ जागा लढत ६२ जागांवर यश मिळविले. त्यांच्या १५ उमेदवारांची अनामत जप्त होऊन १९.९७ टक्के मते घेतली. २००९ च्या निवडणुकीतही युती होऊन भाजपाने ११९, तर शिवसेनेने १६० जागा लढल्या. त्यात भाजपाने ४६, तर शिवसेनेने ४४ जागा जिंकल्या. भाजपच्या पारड्यात १४.०२ टक्के तर शिवसेनेच्या पारड्यात १६.२६ टक्के मते पडली. त्यावेळी शिवसेनेतून बाहेर पडलेल्या राज ठाकरे यांच्या मनसेने १३ जागा जिंकत ५.७१ टक्के मते घेत मोठा दणका दिला होता. त्यावेळी पहिल्यांदा शिवसेनेच्या मतांच्या टक्केवारीत घसरण झाली आणि थोरलेपणाचे आसन डळमळण्यास सुरुवात झाली.
२०१४ च्या निवडणुकीत लहान कोण, मोठा कोण? या वादात भाऊबंदकीचा अध्याय सुरू झाला अन् युती दुंभगली जाऊन भाजपा-सेना स्वतंत्र लढले. मोदी लाटेवर स्वार होत भाजपाने २६० जागा लढत तब्बल १२२ जागांवर विजय संपादन केला. त्यांच्या ४९ उमेदवारांची अनामत जप्त झाली; पण मतांच्या टक्केवारीचा आलेख १४.०२ वरून थेट २७.९१ टक्क्यांवर जाऊन पोहोचला, तर त्या तुलनेत शिवसेनेने २८२ जागा लढवत ६३ जागांवर विजय मिळविला. त्यांच्या १२९ उमेदवारांची अनामत जप्त होऊन मतांच्या टक्केवारीत ३.०९ टक्क्यांनी अल्पशी वाढ झाली. विशेष म्हणजे २००९ मध्ये ५.७१ टक्के मते घेणा-या मनसेच्या मतांच्या टक्केवारीतही घट होऊन ती ३.१५ टक्क्यांवर आली. १९९५ ते २००९ पर्यंत थोरलेपण मिरवणा-या शिवसेनेला जनाधार फारसा वाढविता आला नाही. त्या तुलनेत भाजपाने दर निवडणुकीत जनाधार वाढवत नेत २०१४ मध्ये लक्षणीय मताधिक्य प्राप्त केले. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेकडून थोरलेपण हिसकावून घेत भाजपाने जास्त जागांवर हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे.
बडे मियाँ बडे मियाँ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असेपर्यंत शिवसेना-भाजपा युती अभंग होती. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत पहिल्यांदाच सेना-भाजपा स्वतंत्र लढले. या निवडणुकीत भाजपने ४६ वरून थेट १२२ जागांवर झेप घेतली, तर शिवसेनेला ४४ वरून ६३ जागांवरच मजल मारता आली. २००९ च्या निवडणुकीतच भाजपाने आपणच थोरले असल्याची जाणीव सेनेला करून दिली होती; परंतु थोरलेपणाच्या नशेत वावरणा-या सेनेकडून ही उपाधी भाजपने २०१४ च्या निवडणुकीत हिसकावून घेतली. आता महाराष्ट्राच्या राजकारणात बडे मियाँ बडे मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्ला... असा प्रत्यय आणून देण्यात राष्ट्रीय पक्ष असलेला भाजपा यशस्वी ठरला आहे.
निवडणुकांतील मतांची टक्केवारी
वर्ष भाजपा सेना
1990 10.71 15.94
1995 12.80 16.39
1999 14.54 17.33
2004 13.67 19.97
2009 14.02 16.26
2014 27.81 19.35