‘गाव तिथे एसटी’ नावालाच; अजूनही का सुरू होईना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:11 AM2021-07-20T04:11:59+5:302021-07-20T04:11:59+5:30
नााशिक : कोरोनाचे निर्बंध कमी झाल्यानंतर, राज्य परिवहन महामंडळाला प्रवासी वाहतूक करण्याला परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र, प्रवासी नसल्याने ...
नााशिक : कोरोनाचे निर्बंध कमी झाल्यानंतर, राज्य परिवहन महामंडळाला प्रवासी वाहतूक करण्याला परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र, प्रवासी नसल्याने अजूनही लांब गावखेड्यातपर्यंत बस पोहोचू शकत नसल्याने, गाव तिथे एसटी हे ब्रीद नावापुरतेच उरले असल्याचे सध्याचे चित्र आहे.
कोरोना संकटाच्या काळात राज्य परिवहन महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. बसेस सुरू झाल्या असल्या, तरी अजूनही अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने महामंडळापुढे दैनंदिन खर्चाची चिंता आहेच. सध्या तालुका पातळीवरच्या बससे सुरू असल्या, तरी गाव खेड्यापर्यंत अजूनही बसेस सुरू झालेल्या नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यातही बसेसचे वेळापत्रक नक्की नसल्याने, प्रवाशांच्या गोंधळात अधिकच भर पडली आहे. सध्या केवळ ३० टक्के इतक्याच बसेस धावत असून, निम्म्यापेक्षा अधिक बसेस आगारात उभ्या आहेत. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार बसेसचे नियोजन करावे लागत आहे.
--इन्फो---
खेडेगावात जाण्यासाठी पिकअपचा आधार
तालुक्याच्या गावांपर्यंत बसेस सुरू असल्या, तरी तालुक्यापासून गावापर्यंत जाण्यासाठी प्रवाशांना पिकअपचा आधार घ्यावा लागत आहे. इंधन दरवाढीमुळे प्रवासी खासगी वाहनांच्या प्रवासी भाड्यात वाढ झालेली असल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.
---कोट--
खेडेगावावरच अन्याय का?
पूर्वी गावातल्या रस्त्यावर दिसणारी लालपरी आता दिसेनासी झाली आहे. देवरगाव माझ गाव असून, या गावापर्यंत येण्यास आम्हाला पिकअपचा वापर करावा लागतो. जिपमधील नेहमीचा प्रवास परवडत नसला, तरी आता नाईलाज झाला आहे. बस कधी सुरू होणार, याची कुणी माहितीही देत नाही.
- शंकर जगदाळे, प्रवासी
तालुक्यापर्यंत एसटी बस असली, तरी आम्हाला फार काही उपयोग होत नाही. खासगी वाहनातूनच प्रवास सध्या करावा लागत आहे. त्यातही कधी जीप मिळेलच असे नाही. अनेकदा पायी प्रवास करावा लागतो. बस नसल्यामुळे कोर्टकचेरीची कामेही बंद झाली आहेत.
- रामदास शेवाळे, प्रवासी
----इन्फो---
बस सुरू करण्याबाबतचे कोणतेही लेखी आदेश प्राप्त झालेले नाहीत. सध्या काही शेड्युल्ड सुरू आहेत. ग्रामीण भागासाठी बसेस सुरू करण्याच्या नियोजनाची चर्चा झालेली आहे. मात्र, अद्याप कोणतेही शेड्युल्ड आलेले नसल्याचे, तसेच शासनाच्या आदेशावर सर्वकाही अवलंबून असल्याचे उत्तर महामंडळाचे अधिकारी देत आहेत. बसेस का कमी आहेत, याचीही माहिती त्यांच्याकडे नाही.
---इन्फो---
हजार किलोमीटरचा प्रवास काय कामाचा
१) सध्या दररोज सुमारे एक हजार किलोमीटरचा प्रवास बसेस करीत आहेत. मात्र, यामध्ये ७० टक्के लांब पल्ल्याच्या बसेस असून, तालुका पातळीवर जाणाऱ्या बसेसचे प्रमाण अवघे ३० टक्के इतकेच आहे.
२) प्रवासी संख्या अजूनही कमीच आहे. त्यामुळे महामंडळाला मिळणारे उत्पन्नही पुरेसे नाही. प्रवासी मिळत नसल्याचाही फटका बसला आहे.
३) धुळे, पुणे मार्गावरील प्रवासी संख्या अधिक असल्याने, या मार्गावर बसेस अधिक धावत आहेत. धार्मिक स्थळांवरील बसेसही बंद ठेवण्यात आल्या आहेत.