नाशिकमध्ये लकी ड्रॉच्या नावे कोट्यवधीची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 02:41 PM2017-11-20T14:41:19+5:302017-11-20T14:42:35+5:30
नाशिक : लकी ड्रॉच्या नावे कोट्यवधी रूपये जमा करून गाशा गुंडाळलेल्या ‘गायत्री मार्केटींग’ कंपनीच्या असंख्य गुंतवणूकदारांनी सोमवारी सरकारवाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन आयोजकांविरूद्ध तक्रार दाखल केली असून, पोलिसांंनी गुंतवणूकदारांचे जाब जबाब लिहून घेण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांनी फरार आयोजकाशी संपर्क साधला असता, त्याने लवकरच गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे आश्वासन दिले आहे.
दरमहा साडेचारशे ते सातशे रूपये गोळा करून महिन्यातून एकदा लकी ड्रॉद्वारे सभासदांना दुचाकी वाहन देणा-या या योजनेत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सुमारे दहा हजार नागरिकांनी भाग घेतला होता. गेल्या वर्षी सुरू झालेल्या या योजनेच्या पंधरा महिन्यानंतर जमा होणा-या साडेनऊ हजार रूपयांच्या मोबदल्यात ‘गायत्री मार्केटींग’कंपनी प्रत्येक सभासदाला एलएडी दूरदर्शन संच देणार होता. ही योजना जून महिन्यात संपुष्टात येण्यापुर्वीच आयोजकांनी ठक्कर बजार बसस्थानकानजिक उघडलेले कंपनीचे कार्यालय बंद करून पोबारा केला त्यामुळे हवालदील झालेल्या शेकडो गुंतवणूकदारांनी आयोजकांचा शोध घेण्यास सुरूवात केली. परंतु आज देतो, उद्या देतो असे आश्वासन देणा-या आयोजकांनी अखेर सभासदांचे फोन उचलणेही बंद केले. या संदर्भात ‘लोकमत’मध्ये प्रकाश झोत टाकणारी वृत्तमाला प्रसिद्ध झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी एकत्र येत पोलीस आयुक्तांना फसवणूक झाल्याचे निवेदन दिले होते. आयुक्तांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश सरकारवाडा पोलिसांना दिल्याने सोमवारी असंख्य गुंतवणूकदारांनी सकाळपासूनच सरकारवाडा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिला व ‘गायत्री मार्केटींग’च्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
यावेळी पोलिसांनी गायत्री मार्केटींगच्या भरत पाटील या आयोजकाशी संपर्क साधला असता, त्याने आपण बाहेरगावी असल्याचे सांगितले. दूरदर्शन संच देणा-या कंपनीने आमची फसवणूक केल्यामुळे हा पश्न निर्माण झाला असून, लवकरच गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. परंतु गुंतवणूकदारांनी गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरल्यामुळे पोलिसांनी त्यांचे जाबजबाब नोंदवून घेतले आहेत. दरम्यान, काही गुंतवणूकदारांनी आयोजकांशी संपर्क साधला असता, त्यांना मारहाण करण्याच्या धमक्या देण्यात आल्याची तक्रार काही गुंतवणूकदारांनी केली आहे. येत्या दोन-तीन दिवसात आयोजकांनी गुंतवणूकदारांचे पैसे परत न केल्यास गुन्हा दाखल करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे.