संजीवन समाधी सोहळ्यात माउलींच्या नावाचा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 01:09 AM2019-11-25T01:09:41+5:302019-11-25T01:09:58+5:30
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त रविवारी जुने नाशिक हुंडीवाला लेनमधील संत ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. दिंडी सोहळा, समाधी अभंग, गीता पाठ, कीर्तन तसेच भक्तिसुधा या भक्तिगीत गायनाचा कार्यक्रमदेखील झाला.
नाशिक : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त रविवारी जुने नाशिक हुंडीवाला लेनमधील संत ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. दिंडी सोहळा, समाधी अभंग, गीता पाठ, कीर्तन तसेच भक्तिसुधा या भक्तिगीत गायनाचा कार्यक्रमदेखील झाला.
यावेळी भक्तपरिवाराच्या वतीने ज्ञानेश्वरी पारायण करण्यात आले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने मंदिरात रविवारी काकड आरती करण्यात आली. तालासुरात झालेल्या माउलींच्या आरतीने आणि पुंडलिक वरदा हरी विठ्ठलच्या गजराने रविवारी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. पहाटे काकड आरतीप्रसंगी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते. सकाळच्या काकड आरती सोहळ्यापासून सुरू झालेली
सोमवारी सकाळी ९.३० वाजता कैलास महाराज वेलजाळी यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. रविवारी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांची मंदिरात रीघ लागली होती.
संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त गत आठवड्यापासून विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ करण्यात आला आहे. त्यात शुक्रवारी देवता पूजन आणि पुण्याह वाचन तसेच ज्ञानेश्वरी पारायण आणि महिलांचे भजन असा सोहळा पार पडला. दरम्यान, भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
सप्ताहापासून बीडच्या अनिता चिंचपूरकर यांचे संतचरित्र या विषयावरील कीर्तन रंगले. त्याशिवाय अमृतानुभव पारायण, दशस्कंद भागवत पारायण, भजने, हरिपाठाचे अभंग नित्यनेमाने सादर केले जात होते. त्याशिवाय सोमवारच्या काल्याच्या कीर्तनाने या संजीवन समाधी सोहळ्याची सांगता होणार आहे. या सोहळ्यासाठी मंदिराचे पुजारी पांडुरंग शौचे आणि परिवारासह सर्व भक्त परिवाराने भाविकांसाठी सुविधांची पूर्तता केली.
रविवारी दिंडी सोहळा, समाधी अभंग, आरती आणि महाप्रसाद, गीता पाठ असे विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले, तर सायंकाळी रसिका जोशी-भिडे आणि भक्ती नांदुर्डीकर यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.