त्र्यंबकेश्वरची नालेसफाई नावालाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 05:20 PM2021-06-11T17:20:51+5:302021-06-11T17:21:17+5:30
त्र्यंबकेश्वर : शहरात पावसाळापूर्व नालेसफाई नगरपालिकेने सुरू केली असली तरी ती वरवर केली गेल्याने प्रत्यक्ष पावसाळ्यात कोणत्या समस्येला सामोरे ...
त्र्यंबकेश्वर : शहरात पावसाळापूर्व नालेसफाई नगरपालिकेने सुरू केली असली तरी ती वरवर केली गेल्याने प्रत्यक्ष पावसाळ्यात कोणत्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे, या प्रश्नाने शहरवासीयांना घेरले आहे. दरम्यान, काही लोकप्रतिनिधींकडून स्वत: हजर राहून नालेसफाईवर भर दिला जात आहे.
पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर शहरात पावसाचे प्रमाण जास्तच आहे. शहरात साधारणपणे जून महिन्यात पावसाळा सुरू होण्यापूर्वी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाळी नाले सफाईला सुरुवात होत असते. यंदाही नगरपालिकेने नालेसफाईचा ठेका देऊन कामाला सुरुवात केली असली तरी पावसाळा सुरू होऊन अद्यापही सफाईची कामे सुरूच आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी वरवर नालेसफाई केल्याचे दिसून येत आहे. अजूनही गोदापात्रात मोठ्या प्रमाणावर घाण-कचरा आहे. शहरात पावसाळी गटारी, नदीपात्राचे कॉंक्रीटीकरण झाले आहे. याठिकाणी भाजीविक्रेत्यांकडून शिळा भाजीपाला पात्रात टाकून दिला जातो. याशिवाय शहरातील डेब्रिजही टाकले जाते. त्यामुळे पावसाळ्यात नदीला पूर येऊन पाणी शहरात घुसते. नागरिकांनी नदीपात्रात घाण-कचरा टाकू नये यासाठी नगरपालिकेकडून उपाययोजना केल्या जातात. परंतु नागरिकांकडून दुर्लक्ष केले जात असल्याने अशा लोकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, नालेसफाई विलंब होत असल्याने काही लोकप्रतिनिधी स्वत: हजर राहून कामगारांकडून नालेसफाई करून घेत आहेत.