२६ हजार मतदारांची नावे एकापेक्षा अधिक ठिकाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:16 AM2021-09-23T04:16:03+5:302021-09-23T04:16:03+5:30
नांदगाव : विविध मतदार संघात दुबार नावे आढळून आल्याने प्रशासन सजग झाले असून नांदगाव तालुक्यात सुमारे २६ हजार मतदारांची ...
नांदगाव : विविध मतदार संघात दुबार नावे आढळून आल्याने प्रशासन सजग झाले असून नांदगाव तालुक्यात सुमारे २६ हजार मतदारांची पडताळणी करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनास प्राप्त झाले आहेत. या संदर्भात उपजिल्हाधिकारी तथा ११३ विधानसभा मतदार संघाचे नोंदणी अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी येथे बैठक घेऊन पुढील आदेश दिले आहेत. नांदगाव(११३), नाशिक(१२३,१२४,१२५), या विधानसभा मतदार संघात एकापेक्षा अधिक ठिकाणी मतदार यादीत नावे असलेल्या मतदारांचा सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. नांदगाव शहरात १८००, मनमाडमध्ये ५५०० व उर्वरित मतदार ग्रामीण भागातले आहेत. मूळ गावाहून नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने दुसरीकडे गेलेल्या लोकांची त्या ठिकाणच्या मतदार यादीत नोंदणी होते. त्यामुळे काहीजण निवडणुकीत दोन ठिकाणी मतदान करतात असे आढळून आले आहे. तशा तक्रारीसुध्दा झाल्याने प्रशासनाने मिशन मोडवर सर्व्हे सुरू केला आहे. सर्व्हेत मतदाराला त्याच्या इच्छेनुसार एकाच यादीत नाव ठेवता येणार आहे. सर्व्हे पूर्ण झाल्यावर मतदारांच्या संख्येत घट होईल. परंतु दोनदा मतदान करण्याचा फंडा व त्यानिमित्ताने होणारे आक्षेप कमी होणार आहेत. ५ ऑक्टोबरपर्यंत सर्व्हे पूर्ण करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
दोन ठिकाणच्या मतदार यादीत नाव असल्यास तो फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे. ऑनलाइन यादीमुळे असे घोटाळे स्पष्ट झाले आहेत.