थकबाकीदारांच्या मिळकती मनपाच्या नावावर करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:50 AM2018-08-22T00:50:19+5:302018-08-22T00:50:35+5:30
महापालिकेच्या घरपट्टी थकबाकी पोटी जप्त करण्यात आलेल्या मिळकतींची लिलावप्रक्रिया केली जाते, मात्र बोली लावण्यास कोणी येत नाही. अशा मिळकतींची वसुलीप्रक्रिया अर्धवट राहत असल्याने आता या मिळकतींवर एक रुपयांच्या नाममात्र मोबदल्यात महापालिकेचे नाव लावले जाणार आहेत.
नाशिक : महापालिकेच्या घरपट्टी थकबाकी पोटी जप्त करण्यात आलेल्या मिळकतींची लिलावप्रक्रिया केली जाते, मात्र बोली लावण्यास कोणी येत नाही. अशा मिळकतींची वसुलीप्रक्रिया अर्धवट राहत असल्याने आता या मिळकतींवर एक रुपयांच्या नाममात्र मोबदल्यात महापालिकेचे नाव लावले जाणार आहेत. यासंदर्भात येत्या शुक्रवारी (दि.२४) स्थायी समितीच्या बैठकीत यासंदर्भात प्रस्ताव अहवाल सादर केला जाणार आहे. विशेष म्हणजे स्थायी समितीच्या बैठकीच्या दिवशी १२० मिळकतींचा थकबाकीसाठी लिलाव होणार असून, त्यांना बोली न लावल्यास त्यादेखील महापालिकेच्या नावावर लागणार आहे. महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी मिळकती जप्त करण्याची कार्यवाही करण्यात येते मात्र, त्याच्या वसुलीसाठी नंतर बोली लावल्यानंतरदेखील नागरिक येत नाहीत. नाशिक शहरात काही थकबाकीदार बहुचर्चित असून, त्यातील काही विलफुल डिफॉल्टर म्हणून परिचित असल्याने त्यांच्या मिळकती लिलावात विकत घेण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही. त्यामुळे महापालिकेचे प्रयत्न वाया जातात. त्यावर मात करण्यासाठी महापालिकेने नवीन युक्ती शोधली आहे. त्यानुसार ज्या मिळकतींचे लिलाव काढूनही कोणी खरेदीदार पुढे येणार नाहीत आणि मिळकतधारकही पुढे येणार नाहीत तीच मिळकत आता महापालिका एक रुपये नाममात्र दराने खरेदी करून त्यावर महापालिकेचे नाव लावले जाणार आहे. यामुळे मिळकदार अडचणीत येण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी १२० मिळकतींचे लिलाव
महापालिकेच्या वतीने येत्या शुक्रवारी (दि.२४) सहा विभागांतील १२० मिळकतींचे लिलाव केले जाणार आहेत. चार कोटी १३ लाख रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी हे लिलाव केले जाणार असले तरी याच मिळकतींचे हे तिसऱ्यांदा लिलाव होत असून, त्यामुळे प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमी आहे.