उपउपांत्य फेरी गाठणाऱ्या आठ संघांचीही नावे निश्चित
By admin | Published: July 2, 2014 09:20 PM2014-07-02T21:20:34+5:302014-07-03T00:19:53+5:30
उपउपांत्य फेरी गाठणाऱ्या आठ संघांचीही नावे निश्चित
विश्वचषकामधील बाद फेरीतील पहिल्या टप्प्यातील आठ उपउपांत्यपूर्व सामन्यातील शेवटचे दोन सामने संपले आणि उपउपांत्य फेरी गाठणाऱ्या आठ संघांचीही नावे निश्चित झाली. कालच्या दोन्ही सामन्यात अमेरिका खंड विरुद्ध युरोप खंड अशाच संघांमध्ये सामना असल्यामुळे यामध्ये कोणत्या खंडाची सरशी होते आणि निदान पहिल्या आठ संघांमध्ये यापैकी कोणाचे वर्चस्व रहाते याकडे सर्वांचे लक्ष होते. अर्जेंटिना-स्वित्झर्लन्ड या सामन्यात अर्जेंटिनाने बाजी मारली, तर बेल्जियम-अमेरिका या सामन्यात बेल्जियमने बाजी मारल्यामुळे आता पहिल्या आठमध्ये या दोन्हीही खंडांचे ४-४ संघ दाखल झाल्यामुळे आत्तापर्यंत तरी या विश्वचषकाची ही लढाई समसमान पातळीवर आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार
नाही.
अर्जेंटिनाची अतिरिक्त वेळेत सुटका
अर्जेंटिना - स्वित्झर्लन्ड दोन संघांमध्ये सहा वेळा सामना झालेला होता. यापैकी अर्जेंटिनाने चार सामने जिंकले, तर दोन अनिर्णीत राहिलेले आहेत. त्यामुळे या सामन्यात अर्जेंटिनाचेच पारडे जड वाटत होते. मात्र स्वित्झर्लन्डचे प्रशिक्षक ओटेमार हिझफिल्ड यांनी अर्जेंटिना संघाचा चांगलाच अभ्यास केलेला होता. कारण या आधी त्यांच्याबरोबर खेळलेल्या सामन्यात मेस्सीने स्वित्झर्लन्डविरुद्ध हॅट्ट्रिक साधली होती. म्हणूनच अर्जेंटिना संघामध्ये इतरही खेळाडू चांगले असले तरी लिओनेल मेस्सीला सांभाळल्यास अर्जेंटिना संघाला काबूत करता येईल हे लक्षात घेऊन स्वित्झर्लन्डच्या खेळाडूंनी खेळ केला. मेस्सीकडे चेंडू आला रे आला की त्याच्याभोवती २-३ खेळाडूंचे कोंडाळे करायचे, त्याला थेट शॉट्स घेऊ द्यायचे नाही आणि शक्यतो लगेचच त्याच्या पायातून कशाही प्रकारे चेंडू काढून घ्यायचा अशा प्रकारे स्वित्झर्लन्डचे खेळाडू खेळ करत राहिले आणि त्यांना तसा रिझल्टही मिळाला. त्यामुळेच सामन्याची पहिल्या आणि दुसऱ्या सत्रातही ०-० अशीच परिस्थिती राहिली. अर्थात मेस्सीने काही चांगले प्रयत्न केलेही. त्याचा उत्तरार्धातील ७८व्या मिनिटाचा शॉट तीन-चार बचावपटूंना चकवून गेला. मात्र यावेळी गोली डिएगो बिनाग्लिओने अचूक अंदाज घेत मेस्सीचा हा प्रयत्न वाया घालवला. स्वित्झर्लन्डकडूनही काही चांगले प्रयत्न झाले. त्यांचा मागील सामन्यात हॅट्ट्रिक साधणाऱ्या शकिरीने काही चांगले शॉट्स लगावले, मात्र त्यावर गोल होऊ शकले नाहीत. अर्जेंटिनाला सोपी वाटणारी ही लढत चांगलीच अटीतटीत गेली आणि सामनाही अतिरिक्त वेळेत गेला. अतिरिक्त वेळेच्या पहिल्या पंधरा मिनिटात हीच परिस्थिती राहिली तर दुसऱ्या सत्रातही शेवटपर्यंत हीच परिस्थिती होती आणि आता सामना पेनल्टी शूटआउटमध्ये जाणार असे वाटत असतानाच शेवटची संधी म्हणून मेस्सीने मैदानाच्या मध्य भागातून चेंडू पुढे काढला आणि नेहमीप्रमाणे दोन-तीन बचावपटूंना चकवत डीजवळ आणला. मात्र यावेळी त्याने स्वत: थेट शॉट न मारता तो चेंडू उजवीकडे पास केला. तेथे असणाऱ्या अॅजेल डी मारियाने याचा अचूक अंदाज घेत स्वित्झर्लन्डच्या गोलच्या उजव्या कोपऱ्यात चेंडू मारला. यावेळी गात्र गोली डिएगो बिनाग्लिओ चकला आणि दोन तास (१२० मिनिटे) चाललेला संघर्ष थांबला आणि सामन्यामधील पेनल्टीच्या अनिश्चितेपासून अर्जेंटिनाचा बचावही झाला आणि अर्जेंटिनाने पहिल्या आठमध्ये प्रवेश निश्चित केला.
बेल्जियम-अमेरिकेतही थरार
बेल्जियम-अमेरिका या सामन्यातही असाच थरार बघायला मिळाला. याआधीची या दोन संघांची एकमेकांविरुद्धची कामगिरी बघता सहा सामन्यांपैकी चार सामने हे बेल्जियमने जिंकलेले होते, तर अमेरिकेने एकच विजय मिळविलेला होता. तसेच बेल्जियमने या विश्वचषकामध्ये तीनही साखळी सामने जिंकून नऊ गुणांसह बाद फेरीत प्रवेश केलेला होता, तर अमेरिकेचा बाद फेरीतील प्रवास खडतर असला तरी त्यांनी जर्मनी, पोर्तुगाल आणि अल्जेरिया यांच्याविरुद्धचा खेळ बघता ते रेड डेव्हील्सच्या (बेल्जियमच्या) आत्तापर्यंतच्या सुखकर प्रवासात अडथळा निर्माण करू शकतात, असा विश्वास त्यांचे जर्मनचे प्रशिक्षक जुर्गन क्लिन्समन यांना होता. या प्रमाणे या सामन्यातही शेवटपर्यंत अगदी टोकाचा संघर्ष बघायला मिळाला. बेल्जियमच्या केव्हीन डी ब्रुयाना आणि रोम्युला लूकाका या चेल्सीकडूनही एकत्र खेळणाऱ्या जोडगोळीने वेळोवेळी अमेरिकेच्या गोलवर धडका मारत अमेरिकेचे बचावपटू आणि गोली टीम हॉवर्ड यांना कायम बिझी ठेवले. प्रतिहल्ल्यामध्ये अमेरिकेचा कर्णधार क्टिंट डेम्सी, जॉन्सन, जोझी अल्टेडोर यांनीही काही चांगले प्रयत्न केले. परंतु बेल्जियमचे हल्ले इतके होते की बराच वेळ चेंडू अमेरिकेच्या गोलजवळ होता. बेल्जियमला एकूण १९ कॉर्नर्स मिळाले आणि त्यांनी ३८ शॉट्स गोलकडे मारले यावरून त्यांच्या हल्ल्यांची प्रचिती येते. मात्र अमेरिकेचा गोली टीम हॉवर्ड याच्या जबरदस्त बचावामुळे गोलफलक कोराच राहिला. अगदी शेवटच्या मिनिटाला काउंटर अटॅकमध्ये अमेरिकेचा वॉन्डोलोव्हीस्कीला गोलसमोर अगदी मोकळा मिळालेला चेंडूचे गोलात रूपांतर करता आले नाही, अन्यथा तेथेच सामना संपून अमेरिकेची सरशी झाली असती. शेवटी अतिरिक्त वेळेत गेलेल्या या सामन्यात पहिल्या सत्राच्या तिसऱ्याच मिनिटाला उजव्या बाजूला डी जवळ मिळालेल्या क्रॉसवर केव्हीन डी ब्रुयानाने अचूक कीक लगावत यावेळी गोली टीम हॉवर्डला चकवण्यात यश मिळवले आणि ०-०ची कोंडी फोडली, तर पहिले सत्र संपता संपताच अनेक वेळेच्या प्रयत्नांनंतर रोम्युला लकाकालाही यश मिळाले. त्याने डाव्या बाजूने मारलेला चेंडूही टीम हॉवर्डला चकवून जाळीत गेला आणि बेल्जियमला चक्क २-० आघाडी मिळाली. यानंतरही अमेरिकेकडे दुसऱ्या सत्राची १५ मिनिटे होती. मात्र खेळाडूंच्या हालचालीवरून थकवा जाणवत होता हे लक्षात घेऊन अमेरिकेचे प्रशिक्षक जुर्गन क्लिन्समन यांनी १९ वर्षीय ज्युलियन ग्रीनला मैदानात उतरवले आणि त्यानेही आपल्यावरील विश्वास सार्थ करत लांबून उंचावरून आलेल्या चेंडूचा अचुक अंदाज घेत उजवा पाय उंच करून चेंडूला जाळीत धाडले आणि अमेरिकेच्या आशा पल्लवित केल्या. (तो या स्पर्धेतील गोल करणारा सर्वांत कमी वयाचा खेळाडू ठरला आहे.) या गोलनंतर अमेरिकेकडे १३ मिनिटे होती आणि त्यांना फ्री किकच्या रूपाने संधीही मिळाली. या फ्री किकवर त्यांचा अनुभवी कर्णधार क्लिंट डेम्सीला ही संधी साधता आली नाही. आणि शेवटी २-१ च्या फरकाने बेल्जियमने अंतिम आठमध्ये प्रवेश मिळवला.