नामपूरला कोविड रुग्णालय होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:15 AM2021-04-08T04:15:01+5:302021-04-08T04:15:01+5:30
बागलान तालुक्यात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे . पंधरा दिवसातच कोरोना बाधित रुग्ण संख्येचा आकडा पंधराशे पार झाला आहे ...
बागलान तालुक्यात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे . पंधरा दिवसातच कोरोना बाधित रुग्ण संख्येचा आकडा पंधराशे पार झाला आहे तर वीसहून अधिक रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. कोरोनाची वाढत्या रुग्ण संख्येच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या दोन ते तीन टक्केच असल्याने अपुरी बेड संख्या आणि ऑक्सिजनचा तुटवडा यामुळे गरीब रुग्णांची उपचाराअभावी मोठ्या प्रमाणात हेळसांड होत होती. काही रुग्णांना ऑक्सिजन न मिळाल्याने आपला जीव गमावण्याची वेळ आल्याचे आमदार दिलीप बोरसे यांनी जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत नामपूर येथे कोविड रुग्णालय व अजमिर सौंदाणे व तळवाडे भामेर आश्रमशाळेत कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्याची मागणी केली होती. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी त्याची गंभीर दखल घेत नामपूर ग्रामीण रुग्णालयात ३० बेडचे कोविड रुग्णालय सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. या रुग्णालयात ३० बेडला ऑक्सिजनची सुविधा राहणार आहे. तसेच अजमिर सौंदाणे येथील शासकीय निवासी शाळेत दोनशे बेडचे कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यासोबतच तळवाडे भामेर येथील आश्रमशाळेत कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत . वाढीव बेड संख्येमुळे रुग्णांची सोय होणार आहे .
इन्फो
रुग्णांची होणार सोय
मोसम व करंजाडी खोऱ्यातील बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी नामपूर कोविड रुग्णालय तसेच तळवाडे भामेर शासकीय आश्रमशाळेत सुरू करण्यात येणारे कोविड केअर सेंटर हे मध्यवर्ती ठिकाण असणार आहे. याठिकाणी अडीचशे रुग्णांची सोय होणार आहे. सध्या डांगसौंदणे कोविड रुग्णालयात ३० ऑक्सिजन बेडची सुविधा आहे तर सटाणा शहरातील नामपूर रोडवरील शासकीय वसतिगृहात २०० बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत . तसेच अजमिर सौंदाणे येथील निवासी शाळेत दोनशे बेड उपलब्ध होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.