नांदगाव मतदारसंघ : पडद्याआडच्या हालचालींबाबत उत्सुकता

By admin | Published: August 19, 2014 11:10 PM2014-08-19T23:10:24+5:302014-08-20T00:46:06+5:30

राजकीय ध्रुवीकरणाची प्रक्रिया गतिमान

Nandgaon Constituency: Curiosity about the movements of the screen | नांदगाव मतदारसंघ : पडद्याआडच्या हालचालींबाबत उत्सुकता

नांदगाव मतदारसंघ : पडद्याआडच्या हालचालींबाबत उत्सुकता

Next

संजीव धामणे ल्ल नांदगाव
मतदारसंघात उद्घाटनांच्या निमित्ताने निवडणूक जवळ आल्याचे सूतोवाच झाले. तसेच व्यासपीठावरील नेते मंडळींची उपस्थिती व गैरहजेरी नवीन राजकीय समीकरणांना जन्म देणारी ठरावी, अशी परिस्थिती आहे. राजकीय गप्पांनी रात्रीचे प्रहर उलटत आहेत. खरे किती खोटे किती हा भाग अलाहिदा असला तरी पडद्याआडच्या हालचाली जाणून घेण्यासाठी मंडळी ऊत्सुक आहेत.
मातोश्री, वर्षा, रामटेकवर इच्छुकांनी पायधूळ झाडायला सुरुवात केल्याच्या वार्तांनी राजकीय ध्रुवीकरणास वेग येऊ लागला आहे. कालपरवापर्यंत भुजबळांच्या व्यासपीठावर दिसणारे, माजी आमदार संजय पवार यांनी, गेल्या चार वर्षात राष्ट्रवादीकडून काहीच(?) मिळाले नाही असा आक्षेप घेऊन राजीनामा दिल्याने ते यापुढे कोणत्या पक्षात जातील याची अटकळ बांधणे सुरू झाले आहे. शिवसेनेला अंतर्गत गटबाजीने पछाडले आहे. लोकसभा संघटक अ‍ॅड. जयंत सानप व उपजिल्हाप्रमुख नानाभाऊ शिंंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाली असून, आता कोणाचा नंबर लागणार याची चर्चा आहे. इच्छुक उमेदवार सुहास कांदे यांच्या शिवसेनेतल्या वाढत्या प्रभावामुळे शिवसेनेत दोन गट निर्माण झाले आहेत. तालुकाप्रमुख संतोष गुप्ता व त्यांच्या पाठीराख्यांनी अलीकडे कांदे यांना उघड विरोध केला होता. तर मित्रपक्ष भाजपातर्फे मालेगावातल्या जिल्हा परिषदेच्या तीन गटांच्या बळावर अद्वय हिरे निवडणूक लढविण्याच्या मूडमध्ये आहेत.
या पार्श्वभूमीवर जातीची समीकरणे प्रबळ होतांना दिसत असून, मराठा, माळी व वंजारी यापैकी कोण उमेदवार होणार, असा प्रश्न राजकीय वर्तुळातल्या चर्चेचा गरमागरम विषय आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार पंकज भुजबळ यांच्या उमेदवारीसंदर्भात अनेक प्रवाद आहेत. परंतु या क्षणापर्यंत त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. असे असले तरी ऐनवेळी काहीही होऊ शकते. पंकज भुजबळांपुढे प्रबळ मराठा उमेदवार हे एक मोठे आव्हान ठरू शकते. या गृहीतकावर डावपेच आखले जात असून, भुजबळांच्या गोटातूनही मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही माजी आमदारांनी शिवसेनेच्या तिकिटासाठी मातोश्री गाठल्याचे बोलले जात आहे. माजी आमदार जगन्नाथ धात्रक यांनी १९९५ मध्ये रिपाइंच्या तिकिटावर उमेदवारी केली होती. एरवी भुजबळांच्या व्यासपीठावर दिसणारे धात्रक शेवटच्या उद्घाटनांमध्ये दिसले नाहीत.
पंकज भुजबळांची उमेदवारी हा मतदारसंघ सोडून दुसरीकडे शिफ्ट झाली तर काँग्रेस किंंवा शिवसेना यापैकी कोणत्याही पक्षाकडून मराठा उमेदवार उभा करण्यासाठी राजकीय उलथापालथीचे डावपेच सुरू आहेत. राजकीय ध्रुवीकरणाची प्रक्रिया गतिमान झाली असली तरी गती रोखणाऱ्या ताकदींनी अद्याप सुरुवात केली आहे किंवा नाही हा कळीचा मुद्दा आहे.

Web Title: Nandgaon Constituency: Curiosity about the movements of the screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.