नांदगाव भूमिअभिलेखचा अधिकारी एसीबीच्या गळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2022 11:16 PM2022-03-29T23:16:34+5:302022-03-29T23:17:14+5:30
नांदगाव : बिनशेती मोजणी प्रकार व नकाशा मिळवण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना भूमिअभिलेख कार्यालयाचे अधीक्षक विलास पांडुरंग दाणी ...
नांदगाव : बिनशेती मोजणी प्रकार व नकाशा मिळवण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना भूमिअभिलेख कार्यालयाचे अधीक्षक विलास पांडुरंग दाणी या अधिकाऱ्यास धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
या कारवाईनंतर लाचखोर अधिकारी दाणी यांची कार्यपद्धती व भूमिअभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मनमाड शिवारातील शेतजमिनीचे बिनशेती मोजणी करून व त्याचा नकाशा मिळावा, यासाठी मागील तीन महिन्यांपूर्वी प्रकरण जमा केले होते. याप्रकरणी तक्रारदार यांनी वारंवार भूमिअभिलेख कार्यालयात चकरा मारून प्रकरणाची चौकशी करीत होते.
मात्र या बिनशेती मोजणी व नकाशा मिळविण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक विलास पांडुरंग दाणी यांनी ५० हजार रुपयांची मागणी केली होती. या मागणीनंतर तक्रारदार यांनी धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात संपर्क करत भूमिअभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्याने लाच मागितल्याची तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने सोमवारी (दि.२८) दुपारी दोन वाजेच्या सुमारास धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जुन्या तहसील कार्यालयातील भूमिअभिलेख कार्यालयात सापळा रचून तक्रारदाराकरवी चाळीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना उपअधीक्षक विलास पांडुरंग दाणी यांना पथकाने रंगेहाथ पकडले.
या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक, धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, शरद काटके, राजन कदम, कृष्णकांत वाडीले, कैलास जोहरे, प्रशांत चौधरी, भूषण खलानेकर भूषण शेटे, महेश मोरे, संतोष पावरा, संदीप कदम, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदी सहभागी होते.