नांदगावी मनसेने केली वीजबिलांची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 11:57 PM2020-11-24T23:57:43+5:302020-11-25T00:04:54+5:30
लॉकडाऊन काळातले भरमसाठ वाढीव वीजबिले माफ करावे या मागणीसाठी येथील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारापुढे मनसेच्या कार्यकर्त्यांनी विजेची बिले फाडून त्याची होळी केली.
नांदगाव : लॉकडाऊन काळातले भरमसाठ वाढीव वीजबिले माफ करावे या मागणीसाठी येथील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारापुढे मनसेच्या कार्यकर्त्यांनी विजेची बिले फाडून त्याची होळी केली. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना अवाजवी विजेची नुसती बिले पाठविली नाहीत तर त्यासाठी सक्तीची वसुली सुरू केली असल्याच्या निषेधार्थ नांदगाव तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष कांतिलाल चौबे यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा संघटक डॉ. यशवंत गायकवाड, तालुकाध्यक्ष दीपक म्हस्के, शहराध्यक्ष प्रदीप थोरात, अशोक राजपूत, रवींद्र सोनवणे, राजाभाऊ तरंगे, शंकरराव आंधळे, शंभो आहेर आदी पदाधिकऱ्यांच्या उपस्थितीत मंगळवारी दुपारी नव्या मध्यवर्ती प्रशासकीय संकुलातील तहसीलदारांच्या कार्यालयाबाहेरील प्रवेशद्वारापुढे वाढीव वीजबिले देणाऱ्या सरकारचा निषेध असो अशा घोषणा देत मनसे कार्यकर्त्यांनी वीजबिलांची जाहीर होळी केली. त्यानंतर तहसीलदार उदय कुलकर्णी, तहसीलदार जगताप यांनी कार्यालयाबाहेर येऊन आंदोलनकर्त्या मनसे कार्यकर्त्यांचे लेखी निवेदन स्वीकारले.