नांदगाव मतदारांची नावे यादीतून गायब...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 01:45 IST2020-11-21T20:49:26+5:302020-11-22T01:45:27+5:30
नांदगांव : सरकारी काम आणि सहा महिने थांब असे म्हटले जाते. त्याची प्रचीती नांदगाव विधानसभा मतदार संघातील जेऊर (ता. मालेगाव) गावच्या १६४ मतदारांना येत असून तालुका स्तरावर तक्रारीचे निवारण होत नसल्याने दि. २६ नोव्हेंबर रोजी आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार तांत्रिक चुकीने हिरावून घेतला जात असतांना, चुकीची दुरुस्ती करण्याचे सौजन्य ही प्रलंबित झालेले बघावयास मिळत असल्याची साहेबराव घुगे यांची तक्रार आहे.

विशेष म्हणजे मतदार याद्यांचे काम करणाऱ्या बीएलओ ग्रामसेवकांनी देखील आपल्या संमतीशिवाय नावे कमी झाल्याचे लेखी पत्र नांदगावच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहे. गेल्या दोन महिन्यापासून याबाबतचा पाठपुरावा सुरु असतांना दाखल करण्यात आलेल्या अपिलावर नांदगाव येथील सहाय्य्क विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अद्याप निर्णय घेतला नाही असा आरोप साहेबराव घुगे यांच्यासह गावातील नावे कमी झालेल्या मतदारांनी केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत मतदार याद्यांचे प्रकटीकरण जाहीर झाल्यापासून आता अंतिम याद्यांच्या प्रसिद्धीचा दिवस जवळ येऊनही याबाबत निर्णय झाला नसल्याचा गंभीर प्रकार उघडकीस येत आहे.
नावे कमी झालेल्या मतदारांनी आता जिल्हाधिकाऱ्याकडे धाव घेतली आहे. दरम्यान याबाबत आपल्याकडे जेऊर गावातील ग्रामस्थांची तक्रार प्राप्त झाली असून त्याची शहानिशा सुरु असून लवकरच त्यावर निर्णय घेतला जाईल अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उदय कुलकर्णी यांनी दिली.
नांदगाव विधानसभा मतदार संघातील परंतु मालेगाव तालुक्यातील जेऊर गावातील मतदार यादीचा भाग १०६ व १०७ मधील एकूण १६४ मतदारांची नावे ते स्थलांतरित झाली असल्याचे लेखी पत्र ग्रामपंचायतीच्या लेटरहेडवर नांदगाव येथील निवडणूक शाखेकडे देण्यात आले. या लेखी पत्रावर ग्रामसेवकाची स्वाक्षरी आहे प्रत्यक्षात सदरची सही आपली नसल्याचा खुलासा ग्रामसेवक भामरे यांनी नांदगावच्या तहसीलदारांना २६ ऑक्टोबरला दिलेल्या लेखी खुलाशात केला आहे. कुणाचेही नाव कमी केले नसल्याचे आपल्या जबाबात भामरे यांनी म्हटले आहे. अशाच प्रकारे सुनील कुटे व भालचंद्र साळुंके या संबंधित प्रभागाच्या बीएलओ यांनी आपण निवडणूक शाखेला मतदारांची नावे कमी केल्याबाबत कुठल्याही प्रकारची लेखी माहिती भरून दिली नसल्याचा लेखी खुलासा केला आहे. त्यामुळे नावे कमी झालेल्या मतदारांनी जिल्हाधिकाऱ्याकडे धाव घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान २६ तारखेला आपण नांदगाव येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याची माहिती साहेबराव घुगे यांनी दिली.