नांदगावला जलवाहिनी फुटली
By Admin | Published: February 18, 2016 10:36 PM2016-02-18T22:36:59+5:302016-02-18T22:37:43+5:30
गैरसोय : १६ व्या दिवशीसुद्धा पाणी नाही
नांदगाव : १६ दिवसांनंतर पाणी आले व पाणीपुरवठा सुरू होताच जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी धो धो वाहून वाया गेले. या दुर्दशेला नगरपालिकेस जबाबदार धरून मोठी होळी परिसरातील नागरिकांनी निषेधाचे निवेदन मुख्याधिकारी यांना दिले असून, आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मोठी होळी, भावसार गल्ली, साने गुरुजी नगर, श्रीकृष्णनगर या परिसरात पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी पाणी आल्यानंतर पाच मिनिटात
मोठा आवाज करत फुटली.
पाणी नदीपात्रात वाहून गेले. पाण्यासाठी १६ दिवस वाट बघितलेल्या नागरिकांना एक थेंबही पाणी मिळाले नाही.
भूमिगत गटारीचे काम काही महिन्यांपूर्वी येथे झाले. त्यात राहून गेलेल्या त्रुटींमुळे ही परिस्थिती उद्भवली, असा आक्षेप नागरिकांनी घेतला आहे.
निवेदनात नगरपलिकेच्या निष्क्रियतेमुळे सातत्याने कोठे तरी जलवाहिनी फुटते. इतर कारणांमुळे पाणीपुरवठा लांबणीवर पडतो. परिणामी नागरिकांना पाणी पाणी करत फिरावे लागते अशी स्थिती असून, नगरपालिकेची कर्तव्यशून्य व बेशिस्त भूमिका अशीच राहिली तर कर भरण्यास विरोध करणारे आंदोलन करून पालिकेस धडा शिकविण्याचा निर्धार मुख्याधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.
निवेदनावर देवीदास भावसार, भास्करराव कदम, राजेंद्र
मोकळ, बाळासाहेब गायकवाड, नगीनदास भावसार, ज्ञानेश्वर
बोरसे, विजय भावसार, राजेंद्र गायकवाड, प्रभाकर मोकळ, ईश्वर शिंंदे, हमीद खान, विलास भावसार, सुरेश येवले, राजेंद्र सोनवणे,
अशोक ढासे आदिंंच्या तसेच याच भागात राहणारे व विद्यमान नगराध्यक्षांचे पती राजेंद्र गायकवाड तसेच दोन माजी नगराध्यक्ष प्रभाकर मोकळ व भास्कर कदम यांच्या सह्या आहेत. (वार्ताहर)