नांदूरमधमेश्वरला परदेशी पाहुण्यांचे ‘हिवाळी संमेलन’

By admin | Published: November 8, 2016 01:32 AM2016-11-08T01:32:57+5:302016-11-08T01:29:16+5:30

थंडीचा जोर वाढला : हजारोंच्या संख्येने स्थलांतरित पक्षी दाखल; फ्लेमिंगोची प्रतीक्षा कायम

Nanduram Badhameshar's 'Winter Conference' for Foreign Guests | नांदूरमधमेश्वरला परदेशी पाहुण्यांचे ‘हिवाळी संमेलन’

नांदूरमधमेश्वरला परदेशी पाहुण्यांचे ‘हिवाळी संमेलन’

Next

अझहर शेख  नाशिक
राष्ट्रीय पक्षी अभयारण्याचा दर्जा प्राप्त असलेल्या नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यातील जलाशयावर देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांच्या हिवाळी संमेलनाला सुरुवात झाली आहे.
विजयादशमीचा सण साजरा होताच विविध प्रजातींच्या पक्ष्यांनी सीमोल्लंघन करत नांदूरमधमेश्वरचे जलाशय गाठण्यास सुरुवात केली असून, सध्या या ठिकाणी देशी-विदेशी पक्ष्यांचा मेळा भरला आहे. स्थानिक स्थलांतरित पक्षी जणू यजमानाच्या भूमिकेत असून, पाहुण्यांचे स्वागत करत असल्याचे किलबिलाटावरून लक्षात येते. नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक थंडीचा तालुका म्हणून निफाडची ओळख आहे. यावर्षी जिल्ह्यासह निफाडमध्ये जोरदार पाऊस झाल्याने थंडीचे दमदार आगमन झाले आहे. निफाडच्या हद्दीत पोहचताच सकाळी बोचऱ्या थंडीचा अनुभव येतो. बुधवारी नाशिकचा पारा थेट १०.५ अंशावर पोहचल्याने थंडीचा कडाका वाढला आहे.
चालू आठवड्यापासूनच नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यात देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांचा किलबिलाट कानी पडू लागल्याने यावर्षी मोठ्या प्रमाणात पक्षी दाखल होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सद्यस्थितीत सुमारे वीस प्रकारचे पक्षी नांदूरमधमेश्वर अभयारण्यात विहार करताना दिसून येत आहेत. यामध्ये काही विदेशी स्थलांतरित पक्ष्यांचाही समावेश आहे. एकूणच नांदूरमधमेश्वर अभयारण्याकडे पक्षी येण्याचे प्रमाण वाढू लागल्याने परिसर पक्ष्यांच्या आवाजाने गजबजू लागला आहे. त्यामुळे पक्षीप्रेमींनाही मोह आवरता येत नसून ‘वीकेण्ड प्लॅन’साठी येथील पक्षी अभयारण्याला हौशी व अभ्यासू पक्षीप्रेमींकडून भेट दिली जात आहे.
आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून पक्ष्यांची संख्या अभयारण्यामध्ये वाढू लागल्याचे येथील युवा पक्षी निरीक्षक अमोल दराडे, शंकर लोखंडे यांनी सांगितले. सध्या गोदाकाठ पंचक्रोशीत गुलाबी थंडी जाणवू लागली असून, नोव्हेंबर अखेर थंडीचा प्रभाव अधिक वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे पक्ष्यांचे थवेही मोठ्या प्रमाणात येथील जलाशयावर दाखल होणार असल्याचे पक्षीनिरिक्षकांचे म्हणणे आहे.

Web Title: Nanduram Badhameshar's 'Winter Conference' for Foreign Guests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.