नांदूरमधमेश्वर : घुसखोरीवर ‘तीसरा डोळा’ ठेवणार ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 01:51 PM2019-01-31T13:51:56+5:302019-01-31T14:06:24+5:30
नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात वन्यजीव विभागाने सीसीटीव्ही कॅमेरे या परिसरात बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
नाशिक : आठवडाभरापुर्वी नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यातील पाणथळ जागेवर मासेमारीच्या जाळ्यात अडकून १८ पक्षी मृत्यूमुखी पडले होते. याप्रकरणी वन्यजीव विभागाने अज्ञात मासेमारी करणाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल केला होता. अभयारण्यक्षेत्रात घुसखोरी रोखण्यासाठी चोरवाटांवर ‘तीसरा डोळा’ लक्ष ठेवून राहणार आहे. वन्यजीव विभागाने सीसीटीव्ही कॅमेरे या परिसरात बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रीय अभयारण्याचा दर्जा मिळालेल्या नांदूरमध्यमेश्वर अभयारण्याच्या संरक्षणासाठी विविध उपाययोजना व्यवस्थापन आराखड्यानुसार वन्यजीव विभागाने आखल्या आहेत. याअंतर्गत येत्या महिनाभरात सीसीटीव्ही कॅमेरे या भागात गोपनिय पध्दतीने कार्यान्वित होणार असल्याची माहिती वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्याची नैसर्गिक जैवविविधता अत्यंत समृध्द आहे. विविध स्थलांतरीत देशी-विदेशी पक्ष्यांचे हे नंदनवन तर आहेच, मात्र सहा ते सात वन्यजीवांच्या प्रजाती, विविध प्रकारचे मासे, फुलपाखरु यांसह पाणथळ जागेवरील वनस्पती, गवत, वृक्षांची जैवविविधता हे या अभयारण्याचे वैशिष्टय आहे. पाणथळ जागेवरील पक्ष्यांसह गवताळ भागातील पक्ष्यांचे विविध प्रकार येथे सहज पहावयास मिळतात.
अभयारण्याच्या संवर्धनासाठी नाशिक वन्यजीव विभागाने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. गावकीचे राजकारण शासकिय कामात अडसर निर्माण करत असले तरीदेखील त्यावर समाजप्रबोधन आणि जनजागृतीच्या माध्यमातून मात करणे शक्य असल्याचे यावेळी अंजनकर यांनी सांगितले. चापडगाव संकुल येथून मुख्यत: अधिकृत प्रवेश अभयारण्याच्या क्षेत्रात दिला जातो; मात्र आजुबाजूच्या काही गावांमधून चोरवाटा तयार करण्यात आल्याचे विभागाच्या निदर्शनास आले आहे. वन्यजीव विभागाच्या गस्ती पथकाने या वाटा शोधल्या असून त्यावर पथक नजर ठेवून आहेत; मात्र यासोबतच लवकरच या भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहे. जेणेकरुन संध्याकाळनंतर अभयारण्याच्या प्रदेशात प्रवेश करुन जलाशयात व्यावसायिक उद्देशाने मासेमारी करण्याकरिता जाळे टाकणा-यांवर कारवाई करणे सोपे होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सहायक वनसंरक्षक भरत शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी भगवान ढाकरे, वनपाल अशोक काळे, इको-एको संस्थेचे अभिजीत महाले, वैभव भोगले आदि उपस्थित होते.