नांदूरमधमेश्वर धरण गाळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 01:00 AM2019-05-10T01:00:14+5:302019-05-10T01:00:43+5:30

सायखेडा : हजारो हेक्टर शेती वर्षानुवर्षे ओलिताखाली ठेवणारे निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर धरण जवळपास शंभर वर्षांपूर्वी इंग्रजांनी दूरदृष्टीने बांधले आहे; परंतु त्यात प्रचंड गाळ साचल्यामुळे या धरणाची क्षमता खालावली आहे.

Nanduramdhameshwar dam | नांदूरमधमेश्वर धरण गाळात

 तीन जिल्ह्यांतील मोठ्या शहरांना व शेतीला पाणीपुरवठा करणारे गाळाने भरलेले नांदूरमधमेश्वर धरण.

googlenewsNext
ठळक मुद्देक्षमता १०५० दशलक्ष घनफूट : आता होतो केवळ २५० साठा; तीन जिल्ह्यांना पाणीपुरवठा

सायखेडा : हजारो हेक्टर शेती वर्षानुवर्षे ओलिताखाली ठेवणारे निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर धरण जवळपास शंभर वर्षांपूर्वी इंग्रजांनी दूरदृष्टीने बांधले आहे; परंतु त्यात प्रचंड गाळ साचल्यामुळे या धरणाची क्षमता खालावली आहे.
धरणात गोदावरी, कादवा, बाणगंगा नदीचे पाणी येते, तर गंगापूर, दारणा, वालदेवी, मुकणे, कडवा, ओझरखेड या नाशिक जिल्ह्यातील मोठ्या धरणांतील पाणी येते.
धरण बांधले तेव्हा धरणाची पाणी साठवणूक क्षमता १०५० दशलक्ष घनफूट होती. अनेक दशकानंतर गाळ साचल्याने आज केवळ २५० दशलक्ष घनफूट पाणी साठवणूक होईल एवढेच शिल्लक राहिले आहे.
मोठी क्षमता असलेले धरण आज कादवा, गोदावरी नदीच्या प्रवाहात वाहत येणाऱ्या गाळामुळे जवळपास ७० टक्के भरले असून, क्षमता कमी झाल्याने सलग दुसºया वर्षी धरण कोरडेठाक पडले. अनेक दशके तळ पाहिला नसल्याने आता सलग तीन वर्षांपासून कोरडे पडत असल्याने धरणाची क्षमता कमी झाली असल्याचे स्पष्ट जाणवत आहे.
यामुळे भविष्याचा मोठा धोका वाढतो आहे.
नांदूरमधमेश्वर धरण क्षेत्रात काळी सुपीक जमीन आहे. पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह आल्याने माती वाहून येते. वर्षानुवर्षे वाहत येणाºया मातीने धरण गाळयुक्त झाले आहे. धरणात जलसाठा होईल इतकी जागाच शिल्लक राहिली नाही. मुख्य दरवाजे असलेल्या ठिकाणी अवघे पाच ते सात फूट उंची शिल्लक आहे, तर काही ठिकाणी गाळ पूर्णपणे धरण भिंतीच्या समांतर साचत आला आहे.
गाळ साचल्याने पाण्याची साठवण क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी वाढले की गोदावरीला पूर येतो. सायखेडा, चांदोरी या गावांना पुराचा फटका बसतो.
धरण लाभक्षेत्र असलेल्या गावांना सलग तीन वर्षांपासून एप्रिल, मे महिन्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. धरण क्षेत्र असल्याने पावसाळ्यात पूर येतो, त्यामुळे शेतात कोणतेही पीक येत नाही. घेतले तरी जास्त पाण्यामुळे खराब होते, अशा ठिकाणी केवळ उन्हाळ्यात चांगले पीक येते; मात्र तीन वर्षांपासून धरण कोरडेठाक पडत असल्याने पाणी कमी पडते, पीक घेता येत नाही. धरण क्षेत्र असूनही शेतकऱ्यांना फारसा लाभ होत नाही.
पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. धरण गाळमुक्त झाले तर उन्हाळ्यात जलसाठा टिकून राहील. पर्यायाने पाणी असल्याने शेतात उन्हाळपिके घेता येतील. यासाठी कार्यवाही होण्याची आवश्यकता आहे. शासनाने त्वरित गाळमुक्त धरण करावे, अशी मागणी शेतकरी, सामान्य नागरिक करीत आहेत.गाळमुक्त धरण करण्याची आवश्यकता शासनामार्फत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येते. अनेक ठिकाणी पाण्याची साठवण क्षमता वाढविण्यासाठी नदी, तलाव, ओहळ यांची खोलीकरण करून क्षमता वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच धर्तीवर धरणातील गाळ काढून गाळमुक्त धरण केल्यास पाण्याची क्षमता वाढेल आणि लाभ क्षेत्रातील शेती, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागू शकतो, त्यासाठी विशेष निधीची तरतूद करून जलसंपदामंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे.
२ दहा वर्षांपूर्वी धरणाला आठ वक्र ाकार गेट तयार करण्यात आले; मात्र वक्र ाकार गेटमधून गाळ बाहेर पडत नाही. साचलेला गाळ आणि गेट यात अंतर असल्याने केवळ पाणी वाहून जाते. गाळ वाहून जात नसल्याने वर्षानुवर्षे वाहून आलेल्या गाळामुळे धरण गाळाने भरले आहे. पाण्याची साठवण क्षमता कमी झाली आहे.

Web Title: Nanduramdhameshwar dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण