नांदुरी रस्ता भाविकांनी फुलला
By Admin | Published: April 7, 2017 11:41 PM2017-04-07T23:41:19+5:302017-04-07T23:41:34+5:30
कळवण : चैत्र पौर्णिमेनिमित्त देवीच्या दर्शनासाठी कळवणमार्गे नांदुरीगडाकडे लाखोंच्या संख्येने भाविक मार्गस्थ होत आहेत.
कळवण : चैत्र पौर्णिमेनिमित्त देवीच्या दर्शनासाठी कळवणमार्गे नांदुरीगडाकडे लाखोंच्या संख्येने भाविक मार्गस्थ होत आहेत. या भाविकांना विविध प्रकारच्या सुविधा पुरविण्यासाठी उत्साही कार्यकर्त्यांचीही झुंबड उडाली
आहे.
पहाटे ५ वाजेपासूनच कळवण शहरातील मुख्य रस्ता देवीभक्तांनी फुलून जात असल्याने वाहतूक ठप्प होऊन वाहतुकीची कोंडी होत असल्याने रस्ता एकेरी झाला आहे. कळवण ते नांदुरी रस्ता भाविकांनी फुलून गेला असून, रणरणत्या उन्हाची पर्वा न करता आदिमायेच्या दर्शनाची आस घेऊन देवीभक्त गडाकडे वाटचाल करीत आहेत.
सप्तशृंगनिवासिनी देवी ट्रस्टच्या मोफत महाप्रसादाचा लाखो भक्तांनी भोजनालयात लाभ घेतला असल्याची माहिती देवी ट्रस्टच्या सूत्रांनी दिली. गेल्या ४८ तासात लाखो भाविक कळवणमार्गे नांदुरीकडे मार्गस्थ झाल्याचा अंदाज असून, ठिकठिकाणी देवीभक्तांच्या सेवेसाठी दानशूर समाजधुरिणी अन्नदान, रसवंती, फराळ, पाणीवाटप, आरोग्यसेवा यासह महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
महाले प्रतिष्ठानची मोफत सेवा
चैत्रोत्सवात सप्तशृंगगडाकडे उत्तर महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून पायी जाणाऱ्या भक्तांना सलग दहा वर्षांपासून शिवसेनेचे धुळे महानगरप्रमुख सतीश महाले यांच्या महाले प्रतिष्ठानकडून मोफत उसाचा रस भाविकांना देण्यात येत आहे. भेंडी फाट्यावर ही सेवा सुरू असून, या सेवेसाठी असंख्य देवीभक्तांचे हात सरसावले आहेत. लाखो खान्देशवाशीय देवीभक्तांना मोफत उसाचा रसवाटप करण्याचे काम धुळे शिवसेनेचे महानगरप्रमुख सतीश महाले यांचे महाले प्रतिष्ठान गेल्या नऊ वर्षापासून करीत आहे. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार व जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांच्या पुढाकारातून कळवण पंचायत समितीची आरोग्य विभागाची यंत्रणा तैनात करण्यात आली असून, देवीभक्तांना मोफत औषधोपचार व औषध पुरवठा केला जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथून सहा हजार रु पये टनाचा उच्चप्रतिचा ऊस रस वाटपासाठी आणला जात असून, यासाठी १० उसाच्या गाळप मशिनरीची उभारणी करण्यात आली आहे. गेल्या दहा वर्षांत या मोफत ऊसरस वाटप कार्यक्र मास सुरू आहे.
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, धुळ्याचे पालकमंत्री दादा भुसे, रवींद्र मिर्लेकर, यांनी भेट दिली आहे. शिवसेनेचे धुळे महानगरप्रमुख सतीश महाले यांच्या मार्गदर्शनाखाली मुकेश महाले, भीमा सूर्यवंशी, मुकेश खुळे, गुणवंत वाघ, तरु ण गोयर, धनराज पहिलवान, रावबा यादव आदिंसह शिवसैनिक व समर्थक सक्रि य सहभागी झाले आहेत.
अन्नदानाची परंपरा
कळवण येथील दानशूर व्यक्तिमत्त्व मधुकर मालपुरे, ‘कमको’ माजी अध्यक्ष संजय मालपुरे, माजी सरपंच अजय मालपुरे व मालपुरे परिवार गेल्या २३ वर्षांपासून खान्देशातील देवी भक्तांची अखंड सेवा अन्नदानाच्या माध्यमातून करून सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत.
मालपुरे परिवाराच्या दातृत्वप्रेमापोटी देवीच्या दर्शनासाठी कळवणमार्गे पायी जाणारे देवीभक्त मालपुरेंच्या जोगेश्वरी गोडावूनवरील भंडाऱ्याला हमखास हजेरी लावून पुढे मार्गस्थ होतात हा आजवरचा इतिहास असून, चैत्रोत्सव कालावधीत मालपुरे परिवारासह त्यांचा मित्र परिवार व हितचिंतकांचे शेकडो हात देवीभक्तांच्या सेवेसाठी पुढे सरसावतात. (वार्ताहर)