नांदूरकरांची पाण्यासाठी वणवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 09:48 PM2020-06-08T21:48:02+5:302020-06-08T23:52:38+5:30
सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावातील नळ पाणीपुरवठा योजना गेल्या सहा दिवसांपासून ठप्प असल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असून, पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा लवकरात लवकर सुरुळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावातील नळ पाणीपुरवठा योजना गेल्या सहा दिवसांपासून ठप्प असल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असून, पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा लवकरात लवकर सुरुळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कणकोरी पाच गाव पाणीपुरवठा योजनेतून नांदूरशिंगोटे गावाला नळ पाणीपुरवठा केला जात आहे. नांदूरशिंगोटे येथे मोठी बाजारपेठ व मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी भोजापूर धरणावरील योजनेवर अवलंबून रहावे लागते. गेल्या सहा ते सात वर्षांपासून गावाला दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.
गेल्या बुधवारी (दि.३) निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसल्याने तालुक्यातील अनेक पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत. धरण परिसरात जाणाऱ्या एक्स्प्रेस फीडरवरील सहा ते सात वीजखांब कोसळल्याने कणकोरीसह पाच गाव व मनेगावसह सोळा गाव पाणीपुरवठा योजना बंद आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गेल्या दोन दिवसापासून वीजवितरणकडून वीजखांब उभारण्याचे काम सुरू आहे.
नांदूरशिंगोटे गावात गेल्या सहा दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प असल्याने गोरगरीब जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. आमदार माणिकराव कोकाटे व जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील कार्यकर्त्यांनी पिण्याच्या पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिल्याने महिलांना दिलासा मिळाला आहे. यावेळी तुकाराम मेंगाळ, दत्ता मुंगसे, मंगेश शेळके, सुदाम आव्हाड, संतोष ननावरे, श्रीकांत वाघचौरे, बाळासाहेब ननावरे, शिवाजी लोहकरे, संतोष कुचेकर, शरद शेळके, सचिन पठारे, लहू पठारे आदी उपस्थित होते.