कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नांदूरमधमेश्वर, कळसुबाई अभयारण्य बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 02:46 PM2022-01-13T14:46:36+5:302022-01-13T14:47:32+5:30
नाशिक : वन्यजीव विभागाने निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर व अकोले तालुक्यातील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय ...
नाशिक : वन्यजीव विभागाने निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर व अकोले तालुक्यातील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय बुधवारी (दि.१२) घेतला. कळसुबाई अभयारण्य परिसरात असलेलले सर्व गड, किल्ले, मंदिरे, सांदण दरी आदी पर्यटन ठिकाणांवरदेखील बंदी घातली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने सर्व पर्यटन स्थळावर बंदी घातल्याचा आदेश जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर वन वन्यजीव विभागानेदेखील त्यांच्या परिसरामध्ये असलेल्या राखी वन वन पर्यटन स्थळे तसेच अभयारण्य बंद करण्याचा निर्णय घेतला आहे या पार्श्वभूमीवर नाशिक वन्यजीव विभागाने नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्य पुढील आदेशापर्यंत बंद राहणार असल्याची घोषणा बुधवारी केली आणि हिवाळ्याच्या हंगामात नांदूर मधमेश्वर अभयारण्य कुलूप बंद होत असल्यामुळे पक्षीप्रेमी हौशी पर्यटकांसह स्थानिककांचाही हिरमोड झाला आहे. नांदूरमधमेश्वर अभयारण्यमध्ये पक्ष्यांची रेलचेल वाढली. तसेच आतापर्यंत सुमारे साडेसात हजार पर्यटकांनी भेट दिली असून पर्यटन वाढीस लागत असताना अवघ्या तीन महिन्यांत अभयारण्य बंद करण्याची वेळ ओढावली आहे.
कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येताच सर्वप्रथम कळसुबाई हरिश्चंद्र गड अभयारण्य ''वीकेंड लॉकडाऊन''च्या अटीवर खुले करण्यात आले होते. दरम्यान, हिवाळ्यात अभयारण्य परिसरात हौशी पर्यटक, ट्रेकर्सची वर्दळ वाढू लागली होती. यामुळे स्थानिक नागरिकांनादेखील रोजगार उपलब्ध होत होता. मात्र शहरी भागात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य देखील पूर्ण वेळ बंद करण्याची गरज निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी अभयारण्य परिसरातील भंडारदरा, राजूर या वनपरिक्षेत्रात असलेल्या गावांतील सरपंच, ग्राम परिस्थितीकीय विकास समितीचे पदाधिकारी तसेच या भागात कॅम्पिंग करण्यासाठी तंबूसुविधा देणारे युवक यांच्याशी चर्चा केली. या चर्चेतून अभयारण्य पुढील काही दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला गेल्याचे रणदिवे यांनी सांगितले.
वनपर्यटन, गड किल्ले भ्रमंतीला ‘ब्रेक’
कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसर वन पर्यटनासह कळसुबाई, रतनगड, हरिश्चंद्रगड, पाबरगड, भैरवगड, आजोबागड, अलंग-मलंग-कुलंग आदी गड तसेच प्राचीन अमृतेश्वर मंदिर, सांदण दरी, घाटघर, पांजरे बेट आदी सर्व ठिकाणे पर्यटनासाठी बंद करण्यात आल्याची माहिती नाशिक वन्यजीव विभागाने दिली आहे.