नांदूरमध्यमेश्वर : राष्ट्रीय अभयारण्यात मासेमारीचा सापळा; अठरा पक्ष्यांना जलसमाधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 01:46 PM2019-01-23T13:46:07+5:302019-01-23T13:47:36+5:30
अभयारण्यात मासेमारीच्या सापळ्यात अडकून अठरा पक्ष्यांनी तडफडत जलसमाधी घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
नाशिक : जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर या राष्ट्रीय पक्षी अभयारण्यात मासेमारीच्या सापळ्यात अडकून अठरा पक्ष्यांनी तडफडत जलसमाधी घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यामधील पाणथळ जागा ही ‘रामसर’च्या दर्जाची असल्याचे मानले जात आहे. त्यादृष्टीने संवर्धनासाठी हातभार लागावा, याकरिता प्रस्ताव राज्य वन्यजीवमंडळाकडे सादर क रण्यात आला आहे; मात्र जागतिक दर्जा मिळविण्यासाठी नांदूमध्यमेश्वरच्या पक्ष्यांची जैवविविधतेच्या सुरक्षेचा विचार होणे तितकेच गरजेचे आहे. औद्योगिक क्षेत्रातील मिसळणारे प्रदूषित पाणी, मासेमारीच्या जाळ्यामुळे येथील पक्ष्यांच्या प्रजातीला धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यात नव्हे तर राज्यात सर्वदूर प्रसिध्द असलेल्या या अभयारण्याला वीकेण्डला मोठ्या संख्येने निसर्गप्रेमी पर्यटक भेट देतात. प्रवेश शुल्क, वाहनशुल्कच्या माध्यमातून नाशिक वन्यजीव विभागाकडून लाखोंचा महसूल जमा केला जातो; मात्र नांदूरमध्यमेश्वर अभयारण्याच्या परिसरात पर्यटकांसाठी सोयीसुविधांची वानवा तर जाणवतेच परंतू येथे दरवर्षी हिवाळ्याच्या हंगामात हिवाळी पक्षी संमेलनासाठी हजारो लाखो मैलांचा प्रवास करुन येणाऱ्या पाहूण्या पक्ष्यांनाही सुरक्षित वातावरण उपलब्ध करुन दिले जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे. अभयारण्याच्या क्षेत्रा चोरट्या मार्गाने सर्रास प्रवेश करुन मच्छिमारांकडून पाण्यात जाळे टाकले जात आहे. या जाळ्यांमध्ये अडकून मासे तर मृत्यूमुखी होत आहे; मात्र पक्षीदेखील मरण पावत असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. राज्यातील एकमेव पाणथळ जागा की जेथे विपुल प्रमाणात पक्षी, प्राणी, वृक्ष, गवताची जैवविविधता आढळून येते अशा या पाणथळ जागेच्या संवर्धनासाठी पाहिजे त्या प्रमाणात ठोस उपाययोजना नाशिक वन्यजीव विभागाकडून होत नसल्याने वन्यजीवप्रमी, पक्षीप्रेमी, पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मासेमारी करणाºया स्थानिक नागरिकांच्या गुंडशाही प्रवृत्तीपुढे वन्यजीव विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच ग्राम परिस्थितीकीय विकास समितीचे पदाधिकारी हतबल झाल्याचे चित्र आहे. वन्यजीव विभागाने अज्ञात मासेमारी करणा-यांविरुध्द तत्काळ गुन्हे दाखल करुन अठरा पक्ष्यांच्या मृत्यूस जबाबदार धरण्याची मागणी होत आहे. तसेच अभयारण्याच्या हद्दीत घुसखोरी करुन मासेमारी करणा-यांचा बंदोबस्त करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई वेळीच करण्याची गरज आहे. मासेमारीच्या जाळ्यात सुमारे दोन दिवसांपासून अडकून तडफडत प्राण सोडलेल्या अठरा पक्ष्यांचे देह संपूर्णत: कुजलेल्या अवस्थेत ग्राम परिस्थितीकीय विकास समिती व वन्यजीव कर्मचा-यांना आढळून आले आहे. मृत्युमुखी पडलेल्या पक्ष्यांमध्ये तिरंदाजसारख्या दुर्मीळ पक्ष्यासह नऊ ते दहा पाणकावळे, क्रेन, कॉमन कूटसारख्या प्रजातींचा समावेश आहे. निसर्गाची होणारी ही अपरिमित हानी कधीही न भरून येणारी असल्याचे बोलले जात आहे.
नांदूरमध्यमेश्वर अभयारण्याच्या क्षेत्रात प्रवेश करुन मासेमारी करणे कायद्याने गुन्हा आहे. अभयारण्याला धोका निर्माण करण्याचा अज्ञात मच्छीमारांनी प्रयत्न केला आहे. त्यामुळे यासंदर्भात कर्मचा-यांना तातडीने परिसरात शोध घेत ज्यांनी जाळे अभयारण्यात टाकले त्यांच्यावर कायदेशीर कारवाईच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच नांदूरमध्यमेश्वर अभयारण्याच्या क्षेत्रात गस्त वाढविण्याचे आदेश दिले गेले आहे. अभयारण्याच्या सुरक्षेसाठी सातत्याने प्रयत्न व उपायोजना सुरू असून लवकरच अवैध मासेमारीला अटकाव करण्यास यश येईल.
-अनिल अंजनकर, वनसंरक्षक, वन्यजीव विभाग नाशिक