नांदुरमध्यमेश्वर : गोदापात्रातील गाळात अडकल्याने पाण्यात बुडून दोन बिबटे मृत्युमुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 02:33 PM2021-01-18T14:33:02+5:302021-01-18T14:33:45+5:30
गाळातून बाहेर पडण्याचा या बिबट्याच्या जोडीने प्रयत्नही केल्याचे घटनास्थळाच्या पाहणीतून दिसुन आले; मात्र त्यांना अखेरपर्यंत यश न मिळाल्याने नाका-तोंडात पाणी जाऊन या नर-मादी बिबट्यांचा मृत्यु
नाशिक : भक्ष्याच्या शोधात भटकंती करताना रविवारी (दि.१७) मध्यरात्री नांदुरमध्यमेश्वर भागातील गोदावरीच्या पात्रालगत असलेल्या गाळामध्ये बिबट्याची जोडी अडकून नदीपात्रात बुडाली. यामुळे नाका-तोंडात पाणी जाऊन दुर्दैवाने दोन बिबट्यांचा बळी गेल्याची घटना सोमवारी (दि.१८) उघडकीस आली. मृत्युमुखी पडलेल्या बिबट्यांमध्ये दीड वर्षाचा नर तर चार वर्षाच्या मादीचा समावेश आहे.
निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वरजवळ गोदावरी नदीच्या पुलाला लागून असलेल्या नदीपात्रालगत मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. याच ठिकाणाहून रात्रीच्या अंधारात भक्ष्याचा पाठलागत करताना बिबट नर-मादी गाळामध्ये अडकून पडल्याची माहिती वनविभागाच्या सुत्रांनी दिली. गाळामध्ये दोन्हीही अडकल्यामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही. गाळातून बाहेर पडण्याचा या बिबट्याच्या जोडीने प्रयत्नही केल्याचे घटनास्थळाच्या पाहणीतून दिसुन आले; मात्र त्यांना अखेरपर्यंत यश न मिळाल्याने नाका-तोंडात पाणी जाऊन या नर-मादी बिबट्यांचा मृत्यु झाल्याचे सहायक वनसंरक्षक डॉ. सुजीत नेवसे यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच सकाळी दक्षता पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी बशीर शेख यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही बिबट्यांचे मृतदेह वनरक्षकांनी गाळातून बाहेर काढून पंचनामा केला.
यावेळी नैताळे येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यांनी घटनास्थळी शवविच्छेदन केले असता फुफ्फुसामध्ये पाणी जाऊन गुदमरुन या बिबट्यांचा मृत्यु रविवारी रात्री झाला असावा असा निष्कर्ष त्यांनी दिल्याचे वनविभागाच्या सुत्रांनी सांगितले. शवविच्छदेनानंतर या दोन्ही बिबट्यांच्या मृतदेहांवर तारुखेडले येथील रोपवाटिकेत अंत्यसंस्कार करण्यात आले.