नांदूरशिंगोटे आजपासून चार दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 02:42 PM2020-07-06T14:42:34+5:302020-07-06T14:45:21+5:30
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यात व परिसरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने नांदूरशिंगोटे ग्रामपंचायत प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण गाव चार दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सदर निर्णयाची मंगळवार (दि. ७) पासून अंमलबजावणी केली जाणार असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी नांदूरशिंगोटे येथील ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत गाव बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सरपंच गोपाल शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस उपसरपंच रंजना शेळके, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, दीपक बर्के, भारत दराडे, उत्तम बर्के, अनिल शेळके, निवृत्ती शेळके, पोलीस पाटील मनोहर शेळके, रामदास सानप, एकनाथ शेळके, अनिल पठारे, संतोष सानप, ग्रामविकास अधिकारी एस. डी. अहिरे, आरोग्यसेवक ए. बी. गांगुर्डे, तलाठी एस. डी. जाधव, भाऊपाटील दराडे आदी उपस्थित होते. नांदूरशिंगोटे येथे परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने बाहेरील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण होते. पाच ते सहा दिवसांत परिसरात कोरोना बाधित रु ग्णांची संख्या वाढल्याने त्याचा प्रसार आपल्या गावाकडे होऊ नये म्हणून प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी होती. यापूर्वीही नांदूरशिंगोटे गाव दोन ते तीन वेळा संपूर्णपणे लॉकडाऊन होते. शासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्याने दुकानांमध्ये गर्दी वाढली होती. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली होती. दि. ७ ते १० जुलै हे चार दिवस नांदूरशिंगोटे गावात शंभर टक्के लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. दूध संकलन केंद्रे, पीठ गिरणी, मेडिकल, दवाखाने, गॅस एजन्सी आदी अत्यावश्यक सेवा सुरु राहणार असून किराणा दुकान, खत दुकाने, भाजीपाला विक्र ी केंद्र बंद राहणार आहेत. केवळ आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवेशी निगडीत आस्थापना सुरु राहतील, असे सरपंच गोपाल शेळके यांनी घोषित केले आहे. शासनाने लॉकडाऊनचे कालावधी वाढवून दिला याचा अर्थ परिस्थिती नियंत्रणात असली तरी गंभीर आहे याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी अनावश्यकरित्या घराबाहेर पडणे प्रत्येकाने टाळावे. ग्रामपंचायत क्षेत्रात तोंडाला मास्क, रु माल न बांधता फिरणाऱ्यांवर शंभर रु पये दंड व कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे ग्रामपंचायत प्रशासनाने सांगितले.